मोठी बातमी; आधी पेट्रोल, डिझेलच्या दरांचे अन् आता पीयूसीचे दरातही केली वाढ
By Appasaheb.patil | Published: April 29, 2022 04:29 PM2022-04-29T16:29:38+5:302022-04-29T16:30:03+5:30
दर वाढले; तत्काळ अंमलबजावणीचे परिवहन आयुक्तांनी दिले आदेश
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने वाहनधारक त्रस्त असतानाच आता वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) दर अचानक वाढविल्याने आता ऐन उन्हाळ्यात जास्तीच चटके बसू लागले आहेत. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरूच आहे.
याबाबतचे परिपत्रक परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. वाहन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासाठी आता शुल्कात वाढ करण्यात आली आहे. दुचाकीसाठी शुल्कात ३० टक्के तर चारचाकीसाठी २८ टक्के वाढ करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून पीयूसी केंद्रांकडून या शुल्कात वाढ करण्याची मागणी होत होती. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या दराची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देश परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. याबाबतच सर्वच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना कळविण्यात आले आहेत.
-------
दरांच्या माहितीसाठी बैठक
परिवहन आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात वायू प्रदूषण तपासणी केंद्राच्या मालकांची बैठक घेऊन त्यांना सुधारित दरांची माहिती द्यावी तसेच जनतेस विविध प्रसिध्दी माध्यमातून दरवाढीबाबतची माहिती प्रसारित करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
-----------
फलक लावणे सक्तीचे
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) केंद्रावर सुधारित दराबाबतचे फलक लावण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहेत. जास्तीत जास्त वाहनधारकांना नवे दर समजावे यासाठी केंद्राधारकांनीही प्रचार, प्रसार, प्रसिध्दी करावे, असेही सांगण्यात आले आहे.
------------
अचानक भेटी देण्याच्या सूचना
परिवहन आयुक्तांनी सुधारित पीयूसी दराबाबत विविध गोष्टींची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या शहर व जिल्ह्यातील पीयूसी केंद्रांकडून नव्या दरानुसार पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते की नाही याबाबत खातरजमा करण्याच्या सूचना वायुवेग पथकास दिल्या आहेत.
----------
सुधारित दरवाढ अशी आहे...
- वाहनाचे प्रकार - सध्याचे दर - सुधारित दर
- - दुचाकी वाहन - ३५ - ५०
- - पेट्रोलवरील तीन चाकी वाहन - ७० - १००
- - डिझेलवर चालणारे वाहन - ११० - १५०
- - पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन - ९० - १२५