मोठी बातमी; साडेआठ हजार उमेदवार सोलापुरात देणार MPSC ची पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 04:48 PM2022-01-21T16:48:01+5:302022-01-21T16:49:01+5:30
सोलापूर जिल्ह्यात एकूण २२ केंद्रे : वयोमर्यादा संपलेले चोवीस उमेदवार देणार परीक्षा
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ मध्ये निघालेल्या जाहिरातीची परीक्षा येत्या रविवारी, २३ जानेवारी रोजी राज्यभरात होणार आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण ८ हजार ५६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात एक वर्षाची वयाची सवलत दिल्यामुळे चोवीस विद्यार्थ्यांना वयोमर्यादा ओलांडूनही परीक्षा देण्याची संधी मिळाली. एकूण सोलापूर जिल्ह्यात २२ केंद्रांत ही परीक्षा होणार आहे.
राज्यसेवेची अ व ब गटाची पूर्व परीक्षा २३ जानेवारी रोजी होणार आहे. यात उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक आदी पदांसाठी ही जाहिरात २०२१ मध्ये काढण्यात आली होती. यासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण ८ हजार ५६८ विद्यार्थी बसणार असून यासाठी शहरात २२ केंद्रे असणार आहेत. ही सर्व २२ केंद्रे शहरातील पाच किलोमीटर परिसरात असणार आहेत. रविवारी सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत ही परीक्षा होणार आहे. यंदा कोरोनाच्या अनुषंगाने एका वर्गात फक्त २४ उमेदवारांची सोय असणार आहे. २२ केंद्रांतून एकूण ३५७ वर्गखोल्या परीक्षेसाठी असणार आहेत.
परीक्षेसाठी ९२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना २२ जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावरील सर्वच कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र स्वतःजवळ बाळगणे आवश्यक असणार आहे. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांकडे प्रमाणपत्र नसेल त्या कर्मचाऱ्याने २४ तासांच्या आतील आरटीपीसीआर टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे.
उमेदवारांना मिळणार सुरक्षा किट
परीक्षेत बसणाऱ्या सर्व उमेदवारांना आयोगाकडून सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यासाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या किटमध्ये विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज् देण्यात येणार आहेत.