मोठी बातमी: इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची प्रणाली म्हणून मान्यता मिळणार
By Appasaheb.patil | Published: January 19, 2023 03:07 PM2023-01-19T15:07:07+5:302023-01-19T15:07:24+5:30
३० हजार डॉक्टरांना दिलासा मिळणार; तपासणी व पडताळणी कमिटीचे आरोग्य विभागास ना-हरकत पत्र सादर
सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून औषधांची प्रणाली मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो डॉक्टरांच्या कार्याला यश मिळत असतानाचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची प्रणाली म्हणून मान्यता मिळणार आहे. यासाठीची कमिटीद्वारे होणारी पडताळणी पूर्ण झाली असून, कमिटीने मान्यता देण्यासंदर्भात आरोग्य विभागास ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे सांगण्यात आले.
इलेक्ट्रो होमिओपॅथीला सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने प्रचार, प्रचार व संशोधनास मान्यता दिली होती. त्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांनी इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची मान्यता देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून केंद्राने एक कमिटीची स्थापना केली. या कमिटीला संपूर्ण अभ्यास व पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर कमिटीने पडताळणी करून आरोग्य विभागास अहवाल सादर केला असून, यात इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची मान्यता देण्यास काही हरकत नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्याची प्रत आरोग्य मंत्रालयाचे संचालक डॉ. आर. मीना, आयुष मंत्रालयाचे सेक्रेटरी, डिपार्टमेंट ऑफ लिगल अफ्रेअर्सचे सेक्रेटरी, नीति आयोग, नॅशनल मेडिकल कमिशन व आय. डी. सी. मेंबर यांना पाठविले आहे.
३३ हजार डॉक्टरांना दिलासा मिळणार
इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यातील ३३ हजार डॉक्टरांना दिलासा मिळणार आहे. कमी पैशात चांगला उपचार (हार्बल) लोकांना मिळणार असून त्यातून गरिबांची सेवा होणार आहे. राज्यात ५ ते १० महाविद्यालये असून, ३३ हजारांहून अधिक डॉक्टर सध्या इलेक्ट्रो होमिओपॅथीद्वारे उपचार करीत असल्याचे डॉ. संतोष राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची मान्यता मिळणार आहे. त्यासंदर्भातील सर्व पडताळणी, निर्णय व चर्चा झाली आहे. दरम्यान, लवकरच याबाबतचे बिल पास होणार आहे. मान्यता देण्यासंदर्भातील सर्व निर्णय आरोग्य विभागाला कमिटीने कळविले आहेत.
डॉ. एम. के. एम. शेख
अध्यक्ष, ॲमिथिस्ट सोशल ॲन्ड हेल्थ इन्स्टिट्युशन, सोलापूर