मोठी बातमी; अखेर मनोहर मामाचा खेळ खल्लास.. साताऱ्यात मुसक्या आवळल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 05:36 PM2021-09-10T17:36:56+5:302021-09-10T17:43:50+5:30
पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
सोलापूर : आश्रमात एका महिला शिष्येवर सामूहिक अत्याचार तसेच इतर भक्तांची आर्थिक फसवणूक अशा वेगळ्या प्रकरणात सोलापूर आणि पुणे पोलिसांना हवा असणारा 'मनोहरमामा' हा भोंदूबाबा अखेर साताऱ्यात सापडला. शुक्रवारी दुपारी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला बरोबर हुडकून काढलं.. अन् ताब्यात घेतलं.
मनोहरमामाला लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील सालपे गावातून अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. लोकमत’मधून 'बुवाबाजी पर्दाफाश' होताच उंदरगाव आश्रमातील 'मनोहर मामा' राज्यभर गाजला. त्याच्याविरुद्ध असंख्य तक्रारी येऊनही कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नव्हता, मात्र मंगळवारी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे साताऱ्याच्या एका महिलेने धाव घेतली. अन् इथेच 'मामा'च्या काळ्या कृत्याचा भंडाफोड झाला. या भोंदूबुवासह दोघांवर अत्याचार, खंडणी तसेच जादूटोणा विरोधी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय बारामती पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.