मोठी बातमी; कमी मनुष्यबळामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार मोजणी प्रकरणे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:32 PM2021-02-12T12:32:17+5:302021-02-12T12:34:23+5:30
भूमी अभिलेख कार्यालयात फक्त ५० टक्के अधिकारी
सोलापूर : भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा आहे. मंजूर पदांपैकी ५० टक्के अधिकारी आणि ३० टक्के कर्मचारी पदे रिक्त आहेत. याचा फटका कार्यालयाच्या कामकाजाला बसतोय. भूमी अभिलेख कार्यालयात तब्बल पाच हजारांहून अधिक मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच २५० अपील केसेस प्रलंबित आहेत. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना तालुका तसेच जिल्हा पातळीवर वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
याप्रश्नी आ. बबन शिंदे यांनी विधानसभेत देखील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये पूर्णवेळ अधिकारी आणि कर्मचारी द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहेत. जिल्हा पातळीवर अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. हेमंत सानप हे अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. तालुका पातळीवर ११ उपाधीक्षक पद मंजूर आहेत. दक्षिण सोलापूर, पंढरपूर तसेच बार्शी येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील पदे अद्याप भरलेली नाहीत. माढा तालुक्यात पद भरलेले आहे; परंतु अधिकारी मागील चार महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहे. माळशिरस तालुक्यात देखील हीच परिस्थिती आहे. अक्कलकोट तालुक्यात पद भरलेले आहे; परंतु संबंधित अधिकाऱ्याची पुणे येथे बदली झाली आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
एकूण प्रलंबित मोजणी प्रकरणे - ५०००
प्रति महिना येणारी मोजणी प्रकरणे - ८००
प्रतिमहिना निकाली निघणारी प्रकरणे - ५००
मंजूर अधिकारी पदे - १२
रिक्त पदे - ६
कोरोनाचा जबरदस्त फटका
एकीकडे कमी मनुष्यबळामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचाही फटका कार्यालयाच्या कामकाजावर बसतोय. तालुका पातळीवरील ज्येष्ठ नागरिक भूमी अधीक्षक किंवा उपाधीक्षक कार्यालयात येताना विचार करत आहेत. सुनावणीदरम्यान अनेकांची गैर हजेरी असत आहे. सर्दी, ताप किंवा कोरोनासदृश लक्षणे जाणवत असल्याने यापूर्वीच्या अनेक सुनावणी प्रकरणांमध्ये अर्जदार यांची उपस्थिती नव्हती.
कमी मनुष्यबळ तसेच कोरोनामुळे कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होतोय. उपलब्ध मनुष्यबळात जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- हेमंत सानप, अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, सोलापूर