मोठी बातमी; पंढरपुरातील भीमा नदीला पुराचा धोका; दोन बोटीसह अन्य यंत्रणा सज्ज
By Appasaheb.patil | Published: August 13, 2022 05:13 PM2022-08-13T17:13:19+5:302022-08-13T17:13:25+5:30
पंढरपूर : उजनी व वीर धरणातून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. भीमा नदीच्या पाणीपातळीत सतत वाढ ...
पंढरपूर : उजनी व वीर धरणातून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. भीमा नदीच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. यामुळे येणाऱ्या संभाव्य पूरपरस्थितीवर मात करण्यासाठी तसेच जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून चंद्रभागा नदीत दोन बोटीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेवून तालुक्यात गावपातळीवर तसेच पंढरपूर शहरात आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान केली आहे. यापुर्वीच्या आपत्ती धोक्याचा अभ्यास करुन त्या ठिकाणी आवश्यकती खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच नदीवर चार पुल असून त्यापैकी दगडी पुल पाण्याखाली गेला आहे. नदी काठावरील नागरिकांनी व पंढरपूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. तसेच आपत्तीकालिन परिस्थिचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी सांगितले.
चंद्रभागा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापनातंर्गत महसूल व नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चंद्रभागा नदीत दोन रबरी मोटार बोटीची व्यवस्था करण्यात आली असून, लाइफ जॅकेटस्, फ्लोटींग रिंग, रोप, सर्च लाईट, ध्वनीक्षेपक, रेस्क्यू किट इत्यादी साहित्य उपलब्ध करण्यात आले असून चंद्रभागानदी काठावरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सूचना दिल्याच्या तहसिलदार सुशिल बेल्हेकर व मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.
चंद्रभागा नदीपात्रात भाविकांनी व नागरिकांनी जावू नये तसेच होडी चालकांनी नदीपात्रात होडी घेवून जावू नये यासाठी ध्वनीक्षेपकाव्दारे वेळोवळी सूचनाही प्रशानकडून देण्यात येत आहेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी व भाविकांनी पालन करावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
भीमा नदीपात्रातील विसर्ग
वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, आज दुपारी 4.00 वाजेपर्यत वीर धरणातून नीरा नदी पात्रात 33 हजार 659 क्युसेक्स तर उजनीतून 61 हजार 600 क्सुसेक भीमा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या पंढरपूर मध्ये भीमा नदी 54 हजार 702 क्युसेकने पाणी वाहात आहे. भीमा नदीपात्रात 1 लाख 15 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते, 1 लाख 38 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर 1 लाख 70 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 445.500 पाणी पातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. तर 1 लाख 97 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.