मोठी बातमी; शिकारीसाठी तुरीच्या शेतात जाळे लावून बसलेले चौघे ताब्यात
By Appasaheb.patil | Published: October 22, 2022 05:19 PM2022-10-22T17:19:05+5:302022-10-22T17:19:12+5:30
सोलापूर वन विभागाची कारवाई; बेलाटी येथील कारवाई
सोलापूर : तितर या वन्यपक्ष्यांची शिकार करताना वनविभागाने चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तितर पक्षी, मोबाईल व पिंजरा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई बेलाटी (ता. उ. सोलापूर) येथे करण्यात आली.
वनपरिक्षेत्र सोलापूर अंतर्गत नियतक्षेत्र बेलाटी येथील शेतामध्ये काही लोक वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने जाळे लावून बसले असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. दरम्यान, वनसंरक्षक एल. ए. आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. खलाने यांच्यासह क्षेत्रीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी महेश जनार्धन मसाळ यांच्या शेतामध्ये चौघे तितर पक्ष्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने बसल्याचे दिसून आले. त्या चौघांना वनविभागाने ताब्यात घेतले. सदर प्रकरणामधील आरोपी ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. खलाने हे करीत आहेत.
------
यांना घेतले ताब्यात...
संतोष सोपान माळी (२५, कुरणवाडी, ता. अंबेजोगाई, जि. बीड), नंदकुमार बाबूराव बर्डे (२७, रा. संजयनगर, ता. गेवराई, जि. बीड), सचिन सुभाष पवार (१७, कुरणवाडी, ता. अंबेजोगाई, जि. बीड), सर्जेराव सोपान माळी (कुरणवाडी, ता. अंबेजोगाई, जि. बीड) यांना जाळीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-------------
यांनी केली कारवाई...
सदरची कारवाई उपवनसंरक्षक डी. एम. पाटील, सहा. वनसंरक्षक एल. ए. आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. खलाने, वनपाल एस. बी. कुताटे, वनरक्षक वाय. के. अदलिंगे, ए. एस. शिंदे, गंगाधर कणवस, टी. एम. बादणे, जी. एन. विभुते यांच्या पथकाने केली. तसेच सदर कार्यवाहीकरिता नेचर कॉन्झरवेशन सोलापूर या अशासकीय संस्थेच्या वन्यप्रेमी सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.
---------