मोठी बातमी; सोलापूरच्या एनटीपीसी प्रकल्पात चार दिवस पुरेल इतका कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 12:16 PM2022-04-15T12:16:26+5:302022-04-15T12:16:32+5:30
ध्या एक युनिट किरकोळ दुरुस्तीमुळे काही दिवसांसाठी बंद आहे
सोलापूर : फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पात चार दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा असून कोळसाटंचाईचा सोलापूरच्या प्रकल्पावर सध्यातरी कोणताही परिणाम नाही, असा खुलासा ‘एनटीपीसी’च्या व्यवस्थापनाने केला आहे.
सध्या राज्यासाठी ४ हजार मेगावॅट विजेची कमतरता भासत आहे. ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरेसा पुरवठा होत नाही. कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईचा फटका वीजनिर्मितीवर होत आहे. राज्यातील कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांना पुरेसा इंधनपुरवठा होत नसल्यामुळे वीज उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला आहे; मात्र सोलापूरचा प्रकल्प त्याला सध्यातरी अपवाद आहे.
या प्रकल्पात प्रतिदिन १८ हजार मेट्रिक टन कोळसा वापरला जातो. सध्या ६५ हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध असून चार दिवस कोळशाची गरज भागू शकते. या प्रकल्पात ६६० मेगावॅटची दोन युनिट आहेत. प्रतिदिन १३२० मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. विजेची मागणी वाढत असल्याने दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन करीत असतात. त्यामुळे विजेची मागणी आणि उत्पादन यांचा ताळमेळ उत्तम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...म्हणून कोळसाटंचाई नाही
बहुतेक वीजनिर्मिती प्रकल्प कोळसा खाणींच्या परिसरात उभारण्यात आले आहेत. सोलापूरचा प्रकल्प त्याला अपवाद आहे. कोळसा खाणीपासून सर्वांत लांब ७०० किमी अंतरावर असूनही सोलापूरच्या प्रकल्पाला कोळशाची फारशी कमतरता भासत नाही. यामागचे प्रमुख कारण दोन कोळसा पुरवठा कंपन्यांशी केलेला करार. सोलापूरच्या प्रकल्पाने महानदी कोल फिल्डस (ओडिशा) आणि सिंगरेनी कोलरीज कंपनी (आंध्र प्रदेश) या दोन कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी करार केल्याने टंचाईची समस्या भासत नाही.
एक युनिट तूर्त बंद
नॅशनल ग्रीडच्या मागणीनुसार वीज उत्पादन आणि पुरवठा करावा लागतो. चार महिन्यांपूर्वी विजेची मागणी घटली होती. ग्रीडकडून विजेची मागणीच नसल्याने वीज उत्पादन बंद करण्यात आले होते. सध्या एक युनिट किरकोळ दुरुस्तीमुळे काही दिवसांसाठी बंद आहे. त्यामुळे एकाच युनिटमधून ६६० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे.