माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन; सोलापुरात घेतला अखेरचा श्वास
By Appasaheb.patil | Published: July 30, 2021 10:02 PM2021-07-30T22:02:10+5:302021-07-30T22:36:10+5:30
Ganapatrao Deshmukh : विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.
सोलापूर - सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.
विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता.
२००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.