मोठी बातमी; राज्यातील द्राक्ष निर्यात वाढतेय; आतापर्यंत सव्वालाख टन द्राक्ष निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 04:39 PM2022-03-30T16:39:27+5:302022-03-30T16:42:11+5:30
गुणवत्तेची द्राक्षे; निर्यातीचा वेग सुरूच
सोलापूर : मागील दोन वर्षे कोरोनामुळे अडचण झाल्याची सल मनात ठेवत उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा गुणवत्तेची द्राक्षे तयार केल्याने निर्यात वाढली आहे. सोमवारपर्यंत राज्यातून एक लाख १० हजार ७८२ मे. टन द्राक्षं निर्यात झाली आहेत. अजूनही निर्यातीचा वेग सुरूच असल्याचे सांगण्यात आले.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गुणवत्तेचे उत्पादन आणण्यासाठी कष्ट व पैसे खर्च केले तरी मालाची विक्री करायची अडचण होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढच होत गेली. मागील वर्षी देशांतर्गत द्राक्ष विक्रीची अडचण होती; मात्र निर्यात सुरळीत होती. यावर्षी मात्र शेतीमाल विक्रीची अडचण राहिली नाही. शेतकऱ्यांनी यावर्षी निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षे तयार केली असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातून प्रामुख्याने द्राक्षे निर्यात होत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. युरोपियन देशात ८१ हजार १५३ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. इतर देशात केवळ नाशिक २३ हजार ७३३ टन तर सांगली जिल्ह्यात ५ हजार ८९६ मे.टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. एकुण एक लाख १० हजार ७८२ मे.टन द्राक्ष निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले.
नाशिकची वाटचाल लाखाकडे..
राज्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांमध्ये ९० टक्के वाटा हा एकट्या नाशिक जिल्ह्याचा आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ९७ हजार ५४८ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. अजूनही नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात सुरूच आहे.
* सोलापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यात उशिरापर्यंत व भरपूर पाऊस पडत राहिल्याने अनेक हेक्टर द्राक्ष बागांची नापिकी झाली. याशिवाय जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
* सुरुवातीला काही कंटेनर युक्रेन व रशियाला गेले मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर या दोन्ही देशाची द्राक्ष निर्यात थांबली असल्याचे सांगण्यात आले.
अशी झाली निर्यात...
- * नाशिक- ९७, ५४८
- * सांगली- १०, ३४७
- * सातारा- १,७४१
- * पुणे जिल्हा- ५२७
- * उस्मानाबाद- ३८६
- * लातूर - १३६
- * सोलापूर- ९७
एप्रिल महिनाअखेरपर्यंत द्राक्ष निर्यात होईल. सध्या द्राक्षाचा पीक कालावधी आहे. वाऱ्याचे व अवकाळी संकट आले नाही तर निर्यात वेगाने होईल. देशांतर्गत द्राक्ष विक्रीचे दर वाढत असले तरी द्राक्ष निर्यात करणारा शेतकरी वर्ग वेगळा आहे. यावर्षी आतापर्यंतच्या निर्यातीची आकडेवारी सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, महाराष्ट्र राज्य
यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडत राहिल्याने द्राक्ष बागामध्ये अनेक दिवस पाणी थांबले होते. त्यामुळे अनेक बागांना फलधारणा झाली नाही. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर खर्च करून आणलेल्या मालाला सतत बदलणाऱ्या हवामानामुळे दर मिळाला नाही. १५ मार्चनंतर दर वाढतोय. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर आहे.
- शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ