मोठी बातमी; चार वर्षात कुठेतरी दिसणारा माळढोक यंदा राज्यात कुठे दिसलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 06:03 PM2022-05-26T18:03:12+5:302022-05-26T18:03:15+5:30

महाराष्ट्रातूनही गायब : नान्नज अभयारण्यातील अस्तित्व नामशेष

Big news; In the last four years, the beetle has not been seen anywhere in the state | मोठी बातमी; चार वर्षात कुठेतरी दिसणारा माळढोक यंदा राज्यात कुठे दिसलाच नाही

मोठी बातमी; चार वर्षात कुठेतरी दिसणारा माळढोक यंदा राज्यात कुठे दिसलाच नाही

googlenewsNext

अरूण बारसकर

सोलापूर: दुर्मिळ पक्षी म्हणून गणला जाणारा ‘माळढोक’ आता दिसणेही दुर्मिळ झाले आहे. मागील पाच वर्षे कुठेतरी एक दिसल्याची नोंद झालेला माळढोक यंदा दिसलाच नाही. त्यामुळे माळढोक नावाने ओळखल्या जाणाऱ्या नान्नज अभयारण्यातील माळढोक नामशेष होतो की काय? शिवाय महाराष्ट्रातून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. साधारण १९७९ मध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज परिसरात माळढोक पक्षी दिसला. त्यानंतर राज्यातील पहिले माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज येथे १९८५ मध्ये घोषित झाले. देशात कच्च ( गुजरात), राजस्थान व नान्नज (उत्तर सोलापूर) येथे माळढोक पक्षी अभयारण्ये आहेत. माळढोक पक्षी हा दुर्मिळ पक्षी म्हणून ओळखला जातो.

नान्नज अभयारण्यातील माळढोक पक्ष्याची संख्या २००८ साली ३० पर्यंत पोहोचली होती. नान्नज, कारंबा, अकोलेकाटी, मार्डी, वडाळा परिसरात पसरलेल्या विस्तीर्ण क्षेत्रात सगळीकडे माळढोक पक्षाचा वावर होता. हाच पक्षी कधी-कधी रेहेकुरी (करमाळा), गंगेवाडी (दक्षिण सोलापूर) या गावातील अभयारण्यातही दिसू लागला. त्यामुळे माळढोक पक्षी अभयारण्याची व्याप्ती वाढली. मात्र स्थलांतरित होणारा माळढोक पक्षी हळूहळू दिसणेही दुर्मिळ झाले. मागील चार वर्षे माळढोक सर्वसामान्य पर्यटकांना दिसलाच नव्हता. मात्र वन्यजीव विभागाच्या दप्तरी २०१७ पासून दरवर्षी एक माळढोक दिसल्याची नोंद झाली आहे. यावर्षीच्या पक्षी गणनेत एकही माळढोक आढळला नाही. म्हणजे माळढोक नामशेष झाला की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वर्ष दिसलेले माळढोक

  • २००२- २१
  • २००३- १३
  • २००४- १५
  • २००५- २२
  • २००६- ९
  • २००७ - २४
  • २००८- ३०
  • २००९ - २४
  • २०१०- २१
  • २०११ - ९
  • २०१२- १३
  • २०१३- १०
  • २०१४- ०३
  • २०१५- ०२
  • २०१६ - ०६
  • २०१७- ०१
  • २०१८- ०१
  • २०१९ -०१
  • २०२०- ०१
  • २०२१ - ०१
  • २०२२ - ००

चौकट

जगात केवळ भारतातच ‘माळढोक’

शहामृगापेक्षाही छान व डौलदार माळढोक पक्षी दिसतो. शहामृग पक्षी आफ्रिकेत तर माळढोक पक्षी केवळ भारतातच आढळतो. माळढोक भारतातील उडणारा सर्वाधिक वजनदार पक्षी आहे. भारतात मोठ्या संख्येने आढळणारा 'माळढोक' शिकार झाला असल्याचे वन्यजीव विभागाने म्हटले आहे.

 

नुकत्याच झालेल्या पक्षी गणनेत सोलापूर जिल्ह्यातील नान्नज, गंगेवाडी व इतर ठिकाणच्या माळढोक अभयारण्यात माळढोक पक्षी आढळला नाही. मागील वर्षी गंगेवाडी ( दक्षिण सोलापूर) येथे मादी माळढोक आढळला होता. जून-जुलै महिन्यात पाऊस पडल्यानंतर माळढोक पक्षी दिसणे अपेक्षित आहे.

- तुषार चव्हाण, उपवन संरक्षक, पुणे

...............

नान्नज, राळेरास, पानगाव हद्दीत रस्त्याच्या कामाला ब्रेक

सोलापूर-बार्शी तीनपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. माळढोक अभयारण्यातून रस्ता करण्यास वनविभागाने ब्रेक लावला आहे. त्यामुळे नान्नज, राळेरास, पानगाव हद्दीतील सुमारे सात किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून ठप्पच आहे. त्यामुळे सात किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण तास लागत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Big news; In the last four years, the beetle has not been seen anywhere in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.