मोठी बातमी; सोलापुरातील बांधकाम खर्चात प्रतिचौरस फूट ३०० ते ४०० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 11:00 AM2021-11-09T11:00:43+5:302021-11-09T11:00:49+5:30
सोलापूरमध्ये रेडीपझेशन घरे जुन्याच किमतीत घेण्याची संधी
सोलापूर : कोरोना महामारीमुळे बांधकाम व्यवसायाला प्रचंड फटका बसला आहे. मधल्या काळात शासनाने मुद्रांक शुल्कात काही प्रमाणात सवलत दिल्याने घर खरेदी वाढण्यास मदत झाली, मात्र आता सिमेंट, स्टील, मजुरी, इंधन महागल्याने बांधकाम खर्चातही मोठी वाढ झाली आहे. बांधकाम खर्चात प्रतिचौरस फूट ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन घर खरेदी करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, सोलापूरमध्ये बांधकाम पूर्ण झालेली रेडीपझेशन घरे जुन्याच किमतीत घेण्याची संधीही ग्राहकांना प्राप्त झाली आहे. नवीन बांधकामे महागणार असले तरी, आधी तयार असलेली घरे खरेदी करून भविष्यातील महागडी खरेदी टाळणे शक्य असल्याचे क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी यांनी सांगितले.
जिड्डीमनी यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रास लागणारी मूलभूत सामग्री स्टील, सिमेंट, मजुरी, वाहतूक खर्च इत्यादींच्या किमतींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सिमेंटचे दर २७५ ते २८० रुपयांवरून ३५० ते ४१० प्रतिगोणी झाले आहे, स्टीलचे दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांवरून ६० ते ७० प्रतिकिलो झाले आहेत. डिझेलचे दर प्रतिलिटर ४० रुपयांवरून १०२ प्रतिलिटर झाले आहेत. टाइल्सच्या दरातसुद्धा २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.
---------
घरांच्या प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ
या दरवाढीचा परिणाम सर्व घरांच्या प्रकल्पावर होत आहे. त्यातही परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होईल असे वाटते. असे असले तरी मागील काळात सोलापूरमध्ये अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. यात परवडणारी घरेही मोठ्या प्रमाणात असून ती जुन्याच किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संधीचा ग्राहकांना लाभ घेता येईल. सर्वांसाठी घरे ही योजना यशस्वी करण्यासाठी सरकारनेही पावले उचलून किमान बांधकाम साहित्याच्या किमती ठरावीक काळापर्यंत तरी नियंत्रणात राहतील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, असेही शशिकांत जिड्डीमनी यांनी म्हटले आहे.