Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मनाचा मोठेपणा; ताफ्यातील गाडीतून जखमींना रुग्णालयात पाठवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 10:11 AM2021-07-20T10:11:18+5:302021-07-20T10:11:52+5:30
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा आषाढी वारीच्या महापूजेसाठी 19 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला जात होते. तेव्हाच मोटारसायकलवरून पडून दोन जण जखमी झाल्याचं त्यांना समजलं.
करकंब:- आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. मोटारसायकलवरून पडून जखमी झालेल्या दोघांना त्यांनी आपल्या ताफ्यातील गाडीतून रुग्णालयात पाठवलं आणि त्यांच्यावर उपचार करवून घेतले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा आषाढी वारीच्या महापूजेसाठी 19 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला जात असताना आजोती पाटीच्या आसपास अर्जुन दुर्योधन भोंगळे (वय 42 वर्षे), किरण दत्तात्रेय हेलाडे (वय 30 वर्ष दोघे रा. भैरवाडी ता नेवासा, जि. अहमदनगर) हे मोटारसायकल वरून पडून जखमी झाले होते . ही बाब मुख्यमंत्र्यांना समजताच, त्यांनी त्वरित आपल्या ताफ्यातील गाडीतून जखमींना रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, संबंधितांनी या दोघांना पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. तसंच, त्यांच्या नातेवाईकांना फोन करून या अपघाताची माहितीही पोलिसांनी दिली. आता जखमींची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या आत्मियतेचं गावात कौतुक होतंय.