मोठी बातमी; हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष समितीचे उजनी धरणात जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 12:08 PM2021-05-01T12:08:05+5:302021-05-01T12:08:53+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
भिमानगर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी योजना मंजूर केली. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारल्याने जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या मार्गाने विरोध सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून उजनी धरणात विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.
उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सुरु असून टेंभुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी शनिवारी पहाटे पासूनच शिराळ टे, सुरली, उजनी टे, भिमानगर या गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी देखील छुप्या मार्गाने मिळेल त्या वाटेने शेतकरी उजनी धरण जलाशयाकडे आले आहेत. शेतकरी नेते अतुल खुपसे, जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख यांना आंदोलनस्थळी पोहचू दिले नाही.
या आंदोलनाला माढा तालुका शिवसेना नेते संजय कोकाटे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील, माढा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक नारायण गायकवाड, बाळासाहेब यादव, रांझणी यांनी पाठिंबा देऊन उजनी जलाशयात उतरले आहेत.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, आप्पासाहेब गवळी, आण्णा जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष, प्रशांत काळे माढा तालुका संघटक आदी जण आंदोलनात सहभागी झाले आहेत.