मोठी बातमी; महापुरात बेगमपुर पुलाचे मोठे नुकसान, पुलावरील रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 09:52 AM2020-10-18T09:52:25+5:302020-10-18T09:53:04+5:30
कठड्यावरील सुरक्षा पाईप गेल्या पूर्णपणे वाहून; महापुरामुळे रस्त्याचे झाले नुकसान
मंगळवेढा : मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील बेगमपुर पुलावरील पाणी पूर्णतः ओसरले आहे मात्र या महापुरात पुलावरील सुरक्षा कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत तसेच सुरक्षा पाईप ही तुटून वाहून गेल्या आहेत. पुराच्या पाण्याच्या मोठ्या दाबाने रस्ता उखडला असून रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. यासाठी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी संपूर्ण तपासणी करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे.
उजनीतून विसर्ग कमी करण्यात आल्याने महापूर ओसरला आहे पूर ओसरल्यानंतर भीमेच्या रौद्ररूपाचे परिणाम समोर येत आहे . गेले चार दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. रविवारी पहाटे पाणी पुर्णपणे कमी झाले आहे. माचनूर व बेगमपुर च्या दोन्ही बाजूवरील रस्ता पूर्णपणे उचलून फेकला गेला आहे पुलावरील रस्ता खचला आहे. सुरक्षा कठड्याची मोठी वाताहत झाली आहे.
या वर्षी महापुराने पाण्याची उच्चाकी पाणी पातळी गाठली होती चार लाख क्यूसेस पर्यंत नदीत विसर्ग होता त्यामुळे नदीकाठचे पिकांचे, घराचे अतोनात नुकसान झाले आहे. पुलाचे पाण्यातील पिलरची सुद्धा तपासनी होणे गरजेचे आहे.तरच पुलाला कितपत धोका झाला हे समजणे सोपे होईल. पुलाची दुरावस्था पाहता प्रशासनाने वाहतूक सुरू करण्याची घाई न करता तांत्रिक तपासण्या पूर्ण करून वाहतूक सुरू करावी अशी मागणी दामाजी साखर कारखाना संचालक राजन पाटील यांनी केली आहे.