मोठी बातमी; सोलापुरातील वीजचोरांवर महावितरणची धाड; २० लाखांची वीजचोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 03:58 PM2021-02-27T15:58:35+5:302021-02-27T15:58:40+5:30
सोलापूर मंडलातील कारवाई; २१ ठिकाणी विजेचा गैरवापर केल्याप्रकरणी केली कारवाई
सोलापूर - सोलापूर शहरातील वीजचोरांवर महावितरणने एकाच दिवशी धाड टाकून २० लाखांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. एकाच दिवशी झालेल्या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे व सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील वीजचोरांना जरब बसविण्यासाठी गुरुवारी दिवसभर धडक मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी त्यांनी २४ पथके तयार करून शहरातील वेगवेगळ्या भागांतील वीजचोरांवर कारवाई केली. या पथकांनी ७५९ संशयित वीजचोरांची तपासणी केली असता २६ ठिकाणी थेट वीजचोरी आढळली. त्यांच्यावर विद्युत कायद्यातील कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तर, २१ ठिकाणी विजेचा गैरवापर केल्याप्रकरणी कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. ५१ ठिकाणी मीटर नादुरुस्त आढळून आले. या संपूर्ण मोहिमेत १९ लाख ४२ हजारांचा दंड आकारण्यात आला.
मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य अभियंता पावडे, अधीक्षक अभियंता पडळकर यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन मोहिमेला गती दिली. प्रभारी कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे व त्यांच्या ७४ कर्मचाऱ्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.