मोठी बातमी; महावितरण उभारणार राज्यात १०० व्हेईकल चार्जिंग स्टेशन
By Appasaheb.patil | Published: July 29, 2021 05:05 PM2021-07-29T17:05:52+5:302021-07-29T17:08:50+5:30
पहिल्या टप्प्यात सोलापूरसह नऊ शहरांचा समावेश - जागा शोधण्यासाठी शासनाचे महावितरणला पत्र
अप्पासाहेब पाटील
सोलापूर : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नात आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी १०० नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारीही सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूरसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या शहरात ही स्टेशन्स उभारण्यात येणार असून, त्यासंदर्भात चार्जिंग स्टेशनसाठी जागा शोधून त्वरित अहवाल सादर करण्याचे पत्र शासनाने महावितरणला पाठविले आहे.
इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. राज्यातील सर्वच शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हेइकल लाँच करत आहेत, तर काही कंपन्या लवकरच इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार आहेत. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाइक आणि स्कूटर लाँच करत आहेत आणि विशेष म्हणजे ग्राहकांकडून आता इलेक्ट्रिक वाहनांना ८० ते ९० टक्के प्रतिसाद मिळू लागल्याचे सांगण्यात आले.
----------
सोलापुरात याठिकाणी होणार चार्जिग स्टेशन
- औद्योगिक वसाहत सबस्टेशन, महावितरण, आसरा चौक
- पेपर प्लांट, सब स्टेशन, सिध्देश्वर कारखानाजवळ, कुंभारी
- जुळे सोलापूर सबस्टेशन, महावितरण, जुळे सोलापूर
- विडी घरकुल सबस्टेशन, महावितरण, विडी घरकुल
- एमआयडीसी सबस्टेशन, अक्कलकोट रोड, सोलापूर
- अदित्य नगर सबस्टेशन, विजापूर रोड, सोलापूर
- सिव्हील सबस्टेशन, महावितरण कार्यालय, सोलापूर
-------------
स्टेट नोडल एजन्सी
राज्यात व्हेइकल चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यासाठी शासनाने महावितरण कंपनीची स्टेट नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केली आहे. चार्जिंग स्टेशन उभारणे व त्यांची संख्या वाढविणे हे उद्दिष्ट महावितरणला असणार आहे. त्यादृष्टीने महावितरण कंपनीने त्वरित जागेचा शोध करून अहवाल सादर करावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
-----------
या जागेचा विचार होतोय...
व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी महावितरण कंपनीने महावितरणची कार्यालये, उपकेंद्रे, शहरातील मोकळ्या जागा, मैदाने अशा जागांचा विचार करावा. ज्या जागेवर चार्जरसाठी जागा, एक वाहन बसू शकेल, अशा स्वरूपाची पाच बाय सहा जागा, एक वाहन प्रतीक्षा करू शकेल आणि हालचाल करण्यासाठी वाहनांना पुरेसा परिसर असावा, अशा जागांचा प्राधान्याने विचार करावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आतापर्यंत महावितरण कंपनीने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी १२ चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. आता पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग स्टेशनच्या यादीत सोलापूरचा समावेश आहे. शासनाने आपल्या जिल्ह्यात असलेल्या मोकळ्या जागांची माहिती कळवा, असे सांगितले होते, त्यानुसार सोलापूर शहरातील सात जागा शासनाला कळविल्या आहेत.
-ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर
---------