मोठी बातमी; कर्नाटकातून सोलापुरात आणलेले चिखल कासव जप्त; आठजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 01:29 PM2021-07-10T13:29:48+5:302021-07-10T13:29:54+5:30
तीन वाहनांसह १० लाखांचा ऐवज हस्तगत
सोलापूर : कर्नाटकातून सोलापुरात विक्रीसाठी आणलेले चिखल कासव सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केले. या गुन्ह्यात आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली १० लाख ६५ हजारांची तीन वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
अंधश्रद्धेतून सोलापुरात चिखल कासव विजापूर रोडवरून शांती चौक पाण्याची टाकी ते मार्केट यार्ड या रोडवर विक्रीसाठी आणत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. सचिन हणुमंत नायकोंडे (वय २०, रा. गंगाधर कणबस, दक्षिण सोलापूर), बसवराज शंकर कागर (२५, रा. झळकी, कर्नाटक), परशुराम अमोगसिद्ध पारसोर (३०, झळकी, कर्नाटक), उत्तम सोमण्णा कागर (४०, रा. झळकी, कर्नाटक ), सोमण्णा शिवप्पा कागर (५०, रा. झळकी, कर्नाटक), महांतेश सिद्राम काखंनडी (२५ रा. हेबळगी, कर्नाटक), प्रजोल शिवानंद साबळे (१९, रा. अंजोडगी, कर्नाटक), सिद्धाराम शिवप्पा कागर (२३, रा. झळकी, कर्नाटक) या संशयितांना पोलिसांनी कासवासह ताब्यात घेतले. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून दोन कार, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त शिंदे, उपायुक्त बापू बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संजय क्षीरसागर, वनरक्षक शुभांगी कोरे, वनपाल शंकर कुताटे, पोलीस अंमलदार बाबर कोतवाल, संजय काकडे, स्वप्नील कसगावडे, उमेश सावंत, संजय काकडे, लक्ष्मण उडाणशिव, विनायक बरडे, संदीप जावळे, विजय वाळके यांनी केली.
जप्त केलेले कासव १२ ते १५ वर्षांचे
पोलिसांनी जप्त केलेले कासव हे १२ ते १५ वर्षांचे आहे. चिखल कासवाला इंडियन फ्लॅपशेल टर्टल असे नाव आहे. भारत, बांगलादेश आणि म्यानमार येथे साधारणपणे हे कासव सापडते. तळे, नाले, नदी व विहिरीमध्ये हे कासव राहते. अंधश्रध्देतून आरोपींनी हे कासव विक्रीसाठी आणले होते. लोकांमध्ये असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन अशा कासवांची विक्री केली जाते. नागरिकांनी अशा प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी केले आहे.