मोठी बातमी; सोलापूरच्या शिक्षकाच्या आंदोलनाची मुंबई पोलिसांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 17:38 IST2021-12-14T17:37:47+5:302021-12-14T17:38:10+5:30
आझाद मैदानावर उपोषण : शिक्षणमंत्र्यांची भेट घालून देणार

मोठी बातमी; सोलापूरच्या शिक्षकाच्या आंदोलनाची मुंबई पोलिसांनी घेतली दखल
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक अन्याय केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट तालुक्यातील तडवळ शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी मुंबईत आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाची मुंबई पोलिसांनी दखल घेत मंगळवारी शिक्षणमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले आहे.
नागणसूर कन्नड शाळेतील सहकाऱ्याच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक कट्टीमनी यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीत त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे पती पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत जवळच्या शाळेत बदली मागितली. पण तत्कालीन शिक्षणाधिकारी राठोड यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे अन्याय झाल्याच्या निषेधार्थ कट्टीमनी यांनी डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला व आझाद मैदानावर उपोषणासाठी गेले.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुनावणी घेऊन त्यांना न्याय देण्याचे आदेश दिले. पण शिक्षण विभागाने आदेश काढताना मूळ गाव सोडून नियुक्ती द्यावी असे नमूद केले. यामुळे गटशिक्षणाधिकारी भांजे यांनी शाब्दिक घोळ घालून त्यांना नियुक्ती देण्याचे टाळले. त्यामुळे कट्टीमनी यांनी सोमवारपासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. आझाद पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कट्टीमनी यांच्यावर शिक्षण विभागाने केलेल्या अन्यायाची दखल घेत मंगळवारी शिक्षणमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले आहे.
भांजे यांच्यावर कारवाईची मागणी
गटशिक्षणाधिकारी भांजे यांनी फौजदारी झालेल्या शिक्षकाला हजर करून घेतले, बडतर्फ शिक्षकाचा पगार काढला, बेकायदेशीररित्या बणजगोळच्या शिक्षकाला जेऊरला नियुक्ती दाखविली. आपल्यावर मात्र जाणीवपूर्वक नियम दाखवित अन्याय केला. बांधकाम विभागाने शाळेचे अंतर मोजून दिलेले असताना स्वत:च्या मर्जीने आदेशात कमी अंतर दाखविले. त्यामुळे त्यांची चौकशी करावी अशी मागणी कट्टीमनी यांनी केली आहे.