मोठी बातमी; सोलापुरातील शासकीय रूग्णालयावर महापालिका करणार मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 02:47 PM2021-08-13T14:47:04+5:302021-08-13T14:47:10+5:30
अग्निशमन यंत्रणा उभारण्यात दिरंगाई केल्याबद्दल महापालिका प्रशासन सिव्हिल हाॅस्पिटलवर कारवाई करण्याच्या तयारीत
साेलापूर : अग्निशमन यंत्रणा उभारण्यात दिरंगाई केल्याबद्दल महापालिका प्रशासन सिव्हिल हाॅस्पिटलवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील पत्र शुक्रवारी अधिष्ठातांना देण्यात येईल, असे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यातील काही रुग्णालयांत आगीच्या घटना घडून अनेकांचा बळी गेला. त्यानंतर राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले हाेते. सरकारच्या आदेशानुसार मनपाने शहरातील रुग्णालयांना कार्यवाहीचे पत्र दिले. मात्र सिव्हिल हाॅस्पिटलसह शहरातील १६ रुग्णालयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे महापालिकेच्या आराेग्य अधिकारी डाॅ. अरुंधती हराळकर यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असे शुक्रवार ६ ऑगस्ट राेजी सांगण्यात आले हाेते.
४८ तासांची मुदतही देण्यात आली हाेती. मनपाने या आठवड्यात पुन्हा या रुग्णालयांची तपासणी केली. मात्र १६ पैकी एकाही रुग्णालयाने पूर्तता केली नसल्याचे आराेग्य विभागातून सांगण्यात आले. कारवाईचा प्रस्ताव महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. यादरम्यान, छत्रपती सर्वाेपचार शासकीय रुग्णालयाने मनपाच्या पत्रावर कार्यवाही केलेली नाही. रुग्णालयावर कारवाई करण्याबाबतचे पत्र पालिका प्रशासन देणार आहे.