मोठी बातमी; नरोळेंचा राजीनामा मात्र देशमुखांवरील अविश्वास ठरावाच्या सहीला टाळाटाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 12:25 PM2021-08-12T12:25:54+5:302021-08-12T12:26:01+5:30
म्हेत्रेंकडे पत्र सादर : सोलापूर बाजार समितीतील राजकीय घडामोडींना वेग
साेलापूर : सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळातील राजकारण बुधवारी आणखी तापले. उपसभापती श्रीशैल नराेळे यांनी राजीनामा पत्र तयार केले आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासमाेर ठेवले. दुसरीकडे म्हेत्रे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, सुरेश हसापुरे यांनी बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरुद्ध ठराव दाखल करण्यासाठी काही संचालकांच्या सह्या घेतल्या. या पत्रावर सही करण्यास नराेळे यांनी टाळाटाळ केल्याचे सांगण्यात आले.
आमदार विजयकुमार देशमुख यांना सभापतीपदावरून हटविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. या हालचालींच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश हसापुरे आहेत. आमदार देशमुखांचा सभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सिद्धाराम म्हेत्रे आणि बळीराम साठे यांनी केली हाेती. परंतु, संचालक मंडळाने सांगितले तर राजीनामा देईन, असे प्रत्युत्तर देशमुख यांनी दिले. देशमुखांच्या या भूमिकेनंतर दिलीप माने, बळीराम साठे, सुरेश हसापुरे यांची बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत बैठक झाली. देशमुखांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याचे नियाेजन सुरू झाले. संचालक मंडळातील काही जणांच्या सह्या घेण्यात आल्या. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपसभापती श्रीशैल नराेळे यांना बाेलावून घेतले. माझ्या काेट्यातून तुम्ही उपसभापती झालात. आता मुदत संपल्याने राजीनामा द्या, असे सांगितले. नराेळे यांनी सभापतींच्या नावे राजीनामा पत्र सादर केले. अविश्वासाच्या ठरावावर सही करा, असे सांगताच नराेळे यांनी हात जाेडले. मी तुमच्या ऋणातून मुक्त झालाे, असे सांगत नराेळे यांनी काढता पाय घेतला. नराेळे यांचा राजीनामा देशमुख स्वीकारतील का? याकडे गुरुवारी लक्ष राहणार आहे.
काय बिनसले? काय घडणार?
आमदार विजयकुमार देशमुख यांना सभापती करण्यात माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व सुरेश हसापुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हाेती. हसापुरे आणि नराेळे यांचा जुना दाेस्ताना. मात्र गेल्या दीड वर्षात देशमुख आणि नराेळे यांनी हसापुरे यांना जमेत धरले नाही. यादरम्यान, माजी आमदार दिलीप माने, बळीराम साठे यांनी सभापती बदलण्याची चाचपणी केली. आता म्हेत्रे आणि हसापुरे हे देशमुख यांच्या विराेधात ठाकले आहेत.
देशमुखांचीही फिल्डिंग
बाजार समितीच्या संचालक मंडळात एकूण १८ संचालक आहेत. यातील १५ हून अधिक संचालक आपल्या बाजूने असल्याचा दावा देशमुखविराेधी गटाने केला आहे. मला हटविण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरणारा नाही, असे देशमुखांनी आधीच ठणकावून सांगितले आहे.