मोठी बातमी; नातेपुते-शिंगणापूर महामार्ग केला बंद; जाणून घ्या नेमकं कारण ?
By Appasaheb.patil | Published: July 21, 2023 07:24 PM2023-07-21T19:24:35+5:302023-07-21T19:24:54+5:30
रस्ता सुधारणा काम करण्याचे काम प्रगतीपथावर
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: माळशिरस तालुक्यातील डाळज-कळस-नातेपुते-शिंगणापूर-दहिवडी=पुसेसावळी ते कराड या मार्गावर रस्ता सुधारणा काम करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शिंगणापूर घाट फोडून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून घाट खोदाई करताना दगड, मुरूम रस्त्यावर येऊन वाहनांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत नातेपुते-शिंगणापूर व शिंगणापूर ते नातेपुते हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. वाहनधारकांनी नातेपुते-पिंपरी-कोथाळे-शिंगणापूर या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा याबाबतचा जाहिरनामा सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांनी रस्ता बंद करण्याबाबत वाहतूक शाखेला पत्रव्यवहार केला होता. माळशिरस तालुक्यातील डाळज-कळस-नातेपुते-शिंगणापूर-दहिवडी=पुरेसावळी ते कराड रस्त्यावर हायब्रीड ॲन्युटी मॉडेल या योजनेतंर्गत रस्ता सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिंगणापूर घाटातील ५०० मीटर लांबीत सुधारणा करण्याचे काम अपूर्ण आहे. सध्या घाट फोडून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. घाट फोडताना दगड, मुरूम रस्त्यावर आल्यास वाहनांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने सांगितले आहे.
१५ दिवस लागणार काम पूर्ण होण्यास...
शिंगणापूर घाटात सुरू असलेले काम हे १५ दिवस चालणार आहे. शिंगणापूर घाटातील जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या वाहतूकीकरिता वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.