मोठी बातमी; 'सिध्देश्वर'च्या चिमणी पाडकामाचे नव्याने टेंडर; ८ जानेवारीला उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:26 AM2020-12-22T11:26:13+5:302020-12-22T11:26:34+5:30
महापालिका आयुक्तांनी सुरू केली नव्याने कार्यवाही
सोलापूर - सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणीचे पाडकाम करण्यास नाशिकच्या कंत्राटदाराने नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने मंगळवारी नव्याने निविदा जाहीर केली आहे. ८ जानेवारीला ही निविदा उघडण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाने कारखान्याची चिमणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेने २०१६ मध्ये नाशिकच्या मिहान कंंपनीला पाडकाम करण्याचे काम दिले होते. जून २०१६ मध्ये कार्यवाही सुरू झाली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाडकामाला अभय दिले. त्यानंतर या प्रकरणात पुन्हा चालढकल झाली. कंत्राटदाराने नुकसान झाल्याचा दावाही केला होता.
सोलापुरातून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी ऑगस्ट २०२० पासून सोलापूर विकास मंचने पाठपुरावा सुरू केला आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीही चिमणीचे पाडकाम करण्याची तयारी दाखवली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही पाडकामाला ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतर महापालिकेने मिहान कंपनीला संपर्क साधला. कंपनीने नकार दिल्यानंतर नव्याने निविदा काढण्यात आली आहे. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी असून ८ जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.