मोठी बातमी; कोरोनाला रोखण्यासाठी सोलापुरातील रात्रीच्या संचारबंदीत वाढ होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:30 PM2021-03-24T13:30:46+5:302021-03-24T13:30:53+5:30
पुन्हा लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. लाखो कामगार हवालदिल होतील
सोलापूर : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. पॉझिटिव्हची संख्या रोज तीनशे ते साडेतीनशेच्या पुढे जात आहे. कोरोनाचा हा वेग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोनाचा वाढता वेग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन रात्रीच्या संचारबंदीत वाढ करण्याची शक्यता आहे.
सध्या रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी आहे. ३१ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू आहे. संचार बंदीच्या वेळेत वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून पालकमंत्र्यांच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली. कोरोना उपाययोजना संदर्भात गुरुवारी पालकमंत्र्यांसमोर बैठक होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनबाबत जिल्हा प्रशासनात दोन मतप्रवाह आहेत. काही अधिकारी लॉकडाऊन सक्तीने लागू करा असे सांगतायत. तर काही अधिकारी लॉकडाऊन नको, अशी भूमिका घेत आहेत. यावर वरिष्ठ अधिकारीदेखील विचार करत आहेत.
कोरोना उपाययोजना संदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मागच्या आठवड्यात बैठक होणार होती. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे पालकमंत्र्यांची बैठक रद्द झाली. आता आपत्कालीन बैठक म्हणून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे सोलापुरातदेखील लॉकडाऊन होईल का, अशा प्रतिक्रिया सात ते आठ दिवसांपासून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर उमटताहेत. विशेष म्हणजे नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन लागू करण्यास मजबूर करू नका, असे आवाहन मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे लॉकडाऊनबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत.
लॉकडाऊन नको
सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सांगतात, पुन्हा लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. लाखो कामगार हवालदिल होतील. लॉकडाऊन लागू करण्यापेक्षा अतिकठोर नियम लागू करा. दंडात्मक कारवाया वाढवा. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी संस्थात्मक पातळीवर सर्वांना सामावून घ्या. नियोजन करा. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही.
..............