मोठी बातमी; सोलापुरात रुग्णवाहिकांची तपासणी सुरू; तीन अनफिट ॲम्ब्युलन्स जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 10:27 AM2022-05-20T10:27:26+5:302022-05-20T10:28:07+5:30

रुग्णवाहिकांची तपासणी सुरू : ऑक्सिजन सुविधा, स्ट्रेचरही तकलादू

Big news; No break in Solapur ... No headlights .. Three unfit ambulances seized | मोठी बातमी; सोलापुरात रुग्णवाहिकांची तपासणी सुरू; तीन अनफिट ॲम्ब्युलन्स जप्त

मोठी बातमी; सोलापुरात रुग्णवाहिकांची तपासणी सुरू; तीन अनफिट ॲम्ब्युलन्स जप्त

Next

सोलापूर : रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाईस गुरुवार १९ मे पासून सुरुवात झाली. एका दिवसात १२ रुग्णवाहिकांची तपासणी करण्यात आली. यात ब्रेक, हेडलाईट नसलेल्या वाईट स्थितीत असणाऱ्या ३ रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या.

शहरात १० मे रोजी रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका बंद पडली. सामाजिक कार्यकर्ते राज सलगर व इतर तरुणांनी त्या रुग्णवाहिकेला धक्का देत रुग्णालयापर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे त्या रुग्णावर वेळेवर उपचार करता आले. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करुन रुग्णाचे जीव धोक्यात घालणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

लोकमतच्या वृत्ताची दखल राज्याच्या परिवहन विभागाने घेतली असून वाईट स्थितीत असलेल्या राज्यभरातील रुग्णवाहिकांवर कारवाईस सुरुवात झाली आहे. परिवहन विभागाकडून होणाऱ्या कारवाईचे स्वागत सोलापूर युवक प्रतिष्ठानचे राज सलगर यांनी केले आहे.

 

परिवहन आयुक्तांनी काढले पत्र

लोकमतमधील वृत्ताचा दाखला देत अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी राज्यातील रुग्णवाहिकेच्या तपासणी करण्याबाबत पत्र काढले. राज्याच्या विविध जिल्ह्यात असणाऱ्या विविध रुग्णवाहिकांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या रुग्णवाहिकांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

---------

तपासणी मोहीम यापुढेही सुरूच राहाणार

गुरुवार, १९ मे रोजी राबविलेल्या मोहिमेत १२ रुग्णवाहिकांची तपासणी करण्यात आली. यात ३ रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या. पाच रुग्णवाहिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरूच राहील, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी सांगितले.

 

तपासणीत काय आढळले

रुग्णवाहिकांकडे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, रुग्णवाहिकेचा विमा नसणे, फर्स्ट एड बॉक्स नसणे, स्ट्रेचरची खराब असणे, ऑक्सिजनची परवानगी असलेल्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन नसणे, ब्रेक नादुरुस्त असणे, रुग्णवाहिकेच्या हेडलाईट नादुरुस्त असणे अशा रुग्णवाहिकांवर कारवाई करण्यात आली.

रुग्णवाहिका या नादुरुस्त असल्यास त्यात जाणाऱ्या रुग्णासोबत दुर्दैवी घटना घडू शकते. हे टाळण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या रुग्णवाहिकांवर कारवाई करण्यात येत आहे. रुग्णाच्या हिताचा विचार करून रुग्णवाहिकांनी त्या दुरुस्त कराव्यात. फिटनेस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आरटीओकडून त्वरित अपॉईंटमेंट मिळते. त्यामुळे वेळ न वाया घालता त्वरित फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे.

- अमरसिंह गवारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

Web Title: Big news; No break in Solapur ... No headlights .. Three unfit ambulances seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.