मोठी बातमी; सुरत-चेन्नई कॉरिडॉर हायवेची लवकरच अधिसूचना जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 12:47 PM2022-04-04T12:47:05+5:302022-04-04T12:47:11+5:30
सोलापूरच्या विकासाला बूस्टर डोस देणाऱ्या सुरत-चेन्नई महामार्गाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी क्रांतिकारी ठरणाऱ्या सुरत-चेन्नई एक्स्प्रेस हायवेची अधिसूचना पुढील पाच दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी मान्यता मिळाली असून, सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून त्याची तयारी सुरू झाली आहे.
जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसच्या १५३ किमीच्या महामार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
हा मार्ग कोणत्या गावातून आणि कोणाच्या शेतातून जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत गाव आणि गट नंबर प्रसिद्ध होईल. एकूण ६३ गावांची नावे निश्चित झाली असून, लवकरच याबाबत माहिती प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सोलापूरच्या विकासाला बूस्टर डोस देणाऱ्या सुरत-चेन्नई महामार्गाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. यापूर्वीचा नियोजित महामार्ग सोलापूरच्या हद्दीतून जाणारा नव्हता. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वीचा नियोजित महामार्ग बदलून सुरत - चेन्नई महामार्ग सोलापूरच्या हद्दीतून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या महामार्गामुळे सोलापूरचा कायापालट होणार आहे.