मोठी बातमी; सोलापूरकरांना प्रवास घडविणारे रेल्वेचे जुने डबे अन् इंजिन भंगारात
By appasaheb.patil | Published: July 6, 2021 12:48 PM2021-07-06T12:48:52+5:302021-07-06T12:48:59+5:30
मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग - व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी राबविली ऑनलाइन लिलाव प्रक्रिया
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - कोरोनाच्या काळात रेल्वेला प्रवासी भाड्यातून उत्पन्न मिळाले नसले तरी भंगार विक्रीतून रेल्वेला चांगलेच उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत करण्यात आलेल्या भंगार विक्रीतून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाला ३ कोटी २६ लाख ८८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनामुळे देशातील रेल्वेसेवा अनेक महिन्यांपासून बंद होती. रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न बुडाले. दरम्यान, याचकाळात चालविण्यात आलेल्या मालवाहतूक, किसान रेल्वे व विशेष रेल्वे गाड्यातून रेल्वेला कमी प्रमाणात उत्पन्न मिळाले. कोरोनाकाळात उत्पन्न कमी मिळत असल्याने रेल्वेने भंगार विक्रीची प्रक्रिया अनेकदा राबविली. भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सोलापूर विभागात राबविण्यात आलेल्या चार लिलाव प्रक्रियेत ३ कोटी २६ लाख ८८ हजारांचे उत्पन्न मिळाले. या भंगारात रेल्वेच्या अनेक इमारतींमधील लोखंडाचाही समावेश आहे.
भंगारात जुने रुळ, इंजिनं, रेल्वेच्या डब्यांचा समावेश..
रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुनी इंजिनं, त्यांचे डबे अशा गोष्टींचा समावेश आहे. सध्या सोलापूर विभागातील अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागत आहेत. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भंगार निघते. शिवाय बहुतांश रेल्वे गाड्यांच्या डब्यात बदल झाला, दुहेरीकरणामुळे गेट बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक जुने डबे, वॅगन्स, पुलाचे लाेखंड, रेल्वे गेटचाही भंगारात समावेश होता.
असे मिळाले उत्पन्न...
सोलापूर विभागाने २०२१ या वर्षात एप्रिल व जून या दोन महिन्यात चार वेळा लिलाव प्रक्रिया पार पडली. १९ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या लिलावातून रेल्वेला ३९ लाख २४ हजार तर जून महिन्यातील ११ तारखेला झालेल्या लिलावातून १ कोटी १४ लाख ५७ हजार, २२ तारखेच्या लिलावातून ८० लाख ७० हजार तर ३० जूनच्या लिलावातून ९२ लाख ३७ हजार असे एकूण ३ कोटी २६ लाख ८८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
मध्य रेल्वेच्या साेलापूर विभागात यंदाच्या वर्षी चारवेळा भंगार विक्रीची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून ३ कोटी २६ लाखांचे उत्पन्न मिळाले. प्रवासी भाड्यातून उत्पन्न कमी झाले असले तरी मालवाहतूक, किसान रेल्वे व भंगार विक्रीतून सोलापूर विभागाला चांगले उत्पन्न मिळाले.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल, मध्य रेल्वे....