मोठी बातमी; मार्कंडेय रूग्णालयात आॕक्सिजन टाकीचा स्फोट; ५० फूट उंच धुळीचे लोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 06:44 AM2021-03-25T06:44:13+5:302021-03-25T06:44:54+5:30
आवाज व धुळीच्या लोटामुळे रूग्णालयात परिसरात एकच गोंधळ; जीवीतहानी नाही
सोलापूर : येथील मार्कंडेय सहकारी रूग्णालयात असलेल्या आॕक्सिजन टाकीचा स्फोट झाला. मोठा आवाज होऊन सुमारे ५० फूट उंच धुळीचे लोट या परिसरात पसरले. त्यामुळे रूग्णांसह हाॕस्पिटल प्रशासनही हादरून गेले आहे. या स्फोटात जीवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र रूणांचे काही नातेवाईक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरास ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे मार्कंडेय रूग्णालयाच्या प्रशासनाने अतिरिक्त आॕक्सिजन सिलेंडर मागवले होते. मात्र बुधवारी रात्री अचानक आॕक्सिजनच्या मोठ्या टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट कशामुळे झाला हे समजू शकले नाही. पण या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. स्फोटामुळे सर्वत्र धुळीचे लोट पसरले होते. या भल्या मोठ्या टाकीच्या शेजारीच असलेल्या रिकाम्या जागेत रूग्णांचे काही नातेवाईक जेवण करीत बसले होते. तर काहीजण झोपले होते. अचानक स्फोट झाला आणि सर्वत्र मातीचे लोट पसरले. टाकीच्या शेजारील रिकाम्या जागेत बसलेल्यांचे संपूर्ण शरीर धुळीने माखले.
धुळीच्या लोटामुळे सुमारे १५ मिनिटे समोरचे काहीच दिसत नव्हते. सुदैवाने या स्फोटात जिवीतहानी झाली नाही. मात्र टाकी शेजारील इमारती मध्ये दाखल असलेले रूग्णांना दुसर्या इमारतीमध्ये हलविण्यात आले. अग्निशमनच्या जवानांनी पाण्याच्या फवार्याने पुढील अनर्थ रोखला. या रूग्णालयात कोरोनाचेही रूग्ण आहेत. त्यांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
------------