मोठी बातमी; संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाखरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 03:44 PM2021-07-19T15:44:55+5:302021-07-19T15:45:32+5:30
सर्वसामान्य जनतेने या पालखीचे दर्शन घेत फुले वाहिली
सोलापूर - विठू माऊलीच्या दर्शनाला, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला माऊलीचा पालखी सोहळा निवडक वारकरी बंधूंसह आपल्या लाडक्या एसटीने अगदी दिमाखात वाखरी (ता. पंढरपूर) येथे दाखल झाल्या. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीला परंपरेने चाललेल्या राज्यभरातील विविध तीर्थक्षेत्रांवरून मानाच्या पालख्या या थेट पंढरपूरमध्ये आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळावर जबाबदारी टाकली होती. त्यानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास वाखरीत दाखल झाली. यावेळी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे विठ्ठल जोशीसह आदी सदस्य व पदाधिकारी उपस्थित आहेत.
माऊलीची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. वाटेमध्ये अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनतेने या पालखीचे दर्शन घेत फुले वाहिली. "दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी बंधूंची सेवा करणाऱ्यांचे दायीत्व एसटीने अगदी जबाबदारीने पार पाडले आहे. यंदा माऊलीच्या मानाच्या पालख्या नेण्याचे भाग्य एसटीला मिळाले, हा एसटीचा बहुमान समजला पाहिजे," असे गौरवोद्गार परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी काढले आहेत.