मोठी बातमी; पंढरीत सात लाखाच्या गाडीसह दोन लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 09:10 PM2021-02-08T21:10:45+5:302021-02-08T21:11:19+5:30
कर्नाटकातून पुण्याकडे निघालेल्या गुटख्याची गाडी पंढरपूर पोलिसांनी पकडली; दोघांना केली अटक
पंढरपूर : महाराष्ट्र शासनाने बंदी केलेला पानमसाला व गुटखा कर्नाटक राज्यातून सासवड ( पुणे) येथे घेऊन जाणाऱ्या दोघांना पंढरपूर शहर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाई दरम्यान सात लाखाच्या गाडीसह दोन लाखांचा पानमसाला व गुटखा असा एकूण ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
कर्नाटकातून या गाडीमध्ये लाख रुपयांचा गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला समजले. त्यानुसार पोलीसांनी तत्काळ सापळा रचला.
चडचण (राज्य कर्नाटक) येथून सासवड (पुणे) येथे घेऊन चाललेली एम एच १२ एस यू ७१५६ ही गाडी पंढरपूर पोलिसांनी सरगम चौक येथे आडवली. गाडीच्या तपासणी दरम्यान गाडीमध्ये गुटखा आढळून आला.
निलेश चंद्रकांत मेहत्रे ( वय २९, रा. नेताजी चौक, सासवड, जिल्हा पुणे) व निखिल मनोज पोतदार (वय २६, रा. बसस्थानक नजिक, सासवड, जिल्हा पुणे) हे दोघे स्वतःच्या पान शॉप मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी केलेला पानमसाला व गुटखा विक्रीसाठी घेऊन जातो. त्या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सपोनी. राजेंद्र मगदुम, पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, विनोद पाटील, नागनाथ कदम यांनी केली.