मोठी बातमी; दारूचा विरह सहन न झाल्याने परमिट रूम फोडले; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:57 PM2021-04-09T12:57:00+5:302021-04-09T12:57:07+5:30
होडगी रोडवरील प्रकार : अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : शहरातील होटगी रोडवरील एक परमिट रूम फोडून अज्ञात चोरट्याने पाच हजार शंभर रुपये किमतीची दारूची एक बाटली व त्यासोबत अन्य साहित्य असा एकूण १४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही चोरी ६ एप्रिल रोजी दुपारी १२ ते दि.७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान झाली.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या शहरातील सर्व परमिट रूम व वाईन शॉप बंद आहेत. दारू मिळत नसल्याने दारुड्याने चक्क हॉटेल पुष्कर बारच्या पाठीमागील कंपाउंडवरून आत प्रवेश केला. पाठीमागील दरवाजा तोडून हॉटेलमध्ये गेला व तेथे ठेवलेली महागडी पाच हजार १०० रुपये किमतीची दारूची एक बाटली घेतली. त्याव्यतिरिक्त चार हजार ५०० रोख रक्कम, पाच हजार रुपये किमतीचा कॉम्प्युटर चोरून नेला.
दरम्यान, दीपक रामचंद्र मोरे (४३ रा. विजयनगर, नई जिंदगी रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास हवालदार घुगे करीत आहेत. दारुड्यांनी थेट परमिट रूम फोडल्याने परमिट रूम धारक व वाइन शॉप चालक-मालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.