मोठी बातमी; दगडाचा ढिगारा काढला अन् आढळली कोब्रा सापाची सात पिल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 05:17 PM2021-09-20T17:17:44+5:302021-09-20T17:17:49+5:30
विडी घरकुल येथील घटना : पिल्लांना केले निसर्गात मुक्त
सोलापूर : विडी घरकपल परिसरात साप दिसल्याचे सर्पमित्रांना कलविण्यात आले. त्यांनी साप दिसलेल्या ठिकाणचा दगडाचा ढागारा वेगळा केला अन त्यांना एक नव्हे तर सात कोब्रा जातीच्या विषारी सापाची पिल्लं आढळली.
शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता जुना विडी घरकुल या ठिकाणी कटिंग सलून चालक राकेश मामड्याकूल यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना साप दिसल्याची माहिती दिली. राहुल शिंदे व नॅचरल ब्लु कोब्रा संस्थेचे अध्यक्ष अनिल अलदार हे घटनास्थळी आले. त्यांनी नागाच्या पिल्लास पकडले. त्या दगडाच्या ढिगाऱ्यात अधिक पाहणी केली असता तेथे एका मागे एक अशी तब्बल ६ कोब्रा नागाची पिल्ले आढळून आली.
इतक्या मोठ्या प्रमाणात नागाची पिल्ले बाहेर पडल्यामुळे सर्वांचीच धांदल उडाली. सर्व नागाची पिल्लं सैरावैरा पळू लागली. तरीही अतिशय शिताफीने या नागाच्या पिल्लांना कसलीही इजा होऊ न देता पकडून एका मोठ्या बकेटमध्ये ठेवण्यात आले.
-------
एक पिल्लू निसटले तर ६ सापडली
सर्पमित्रांनी एकूण ६ नागाची पिल्लं पकडण्यास यश आले. तर त्यांना पकडण्याच्या धावपळीत पण एक पिल्लू निसटून गवतात निघून गेले. काही वेळाने सर्व सापांना सुरक्षितरीत्या निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. नागाच्या पिल्लं ही विषारी असल्याने त्यांना पकडणे हे अतिशय जिकरीचे व जोखमीचे काम होते. या पिल्लांच्या लांबीत फरक असून त्यांच्या वयातही फरक असावा आणि ही एकाच मादीची पिल्लं नसून वेगवेगळी असावीत, भक्ष्याच्या शोधात ही सर्व नागाची पिल्लं जमली असावीत आणि तेथील दगडाच्या ढिगाऱ्यात लपली असावीत असा अंदाज सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी वर्तविला.