मोठी बातमी; प्लास्टिकमुळे सोलापूर शहराच्या प्रदूषणात वाढ; सोलापूर विद्यापीठाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 12:53 PM2021-08-07T12:53:28+5:302021-08-07T12:53:41+5:30
अहिल्यादेवी हाेळकर विद्यापीठाचा महापालिकेला अहवाल
साेलापूर : प्लास्टिकच्या अतिवापरामुळे शहराच्या प्रदूषणात वाढ हाेत आहे. महापालिकेच्या कारवाईदरम्यान काही भागात याला चाप बसला हाेता, असे मत पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर साेलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डाॅ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
राज्यातील महापालिकांना शहरातील पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाने हा अहवाल तयार केला असून ताे शुक्रवारी कुलगुरु फडणवीस यांनी महापाैर श्रीकांचना यन्नम यांना सादर केला. यावेळी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते आनंद चंदनशिवे, मंडई उद्यान सभापती गणेश पुजारी, उपायुक्त धनराज पांडे, विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख विनायक धुळप, स्वप्निल सोलनकर आदी उपस्थित होते. या अहवालात विद्यापीठाने विविध निरीक्षणे नाेंदवली असून पालिकेला काही सूचनाही केल्या आहेत. यात पालिकेने केलेल्या काही चांगल्या कामांचाही उल्लेख आहे.
माझी वसुंधरा अभियानात साेलापूर मनपाचा गाैरव
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात पालिकेने सहभाग घेतला आहे. राज्यातील ४७ अमृत शहरांमध्ये साेलापूर महापालिकेने ११ वा क्रमांक पटकाविला आहे. शासनाकडून आलेले प्रमाणपत्र मनपा आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांनी महापाैर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे सुपूर्द केले.