मोठी बातमी; मोठया पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये पूरस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 05:57 PM2021-09-09T17:57:09+5:302021-09-09T17:57:15+5:30
सोला पूर : मागील आठ दिवस सलग पावसाची हजेरी लागल्याने तब्बल ३४ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, यामुळे २६०५ ...
सोलापूर : मागील आठ दिवस सलग पावसाची हजेरी लागल्याने तब्बल ३४ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, यामुळे २६०५ हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान मोहोळ तालुक्यात झाले असून, २९ गावे बाधित झाली आहेत. सध्या बाधित गावांचे आणि पीकक्षेत्रांचे पंचनामे सुरू असून, लवकरच पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
मोहोळसोबत माढा तालुक्यातील ५ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, या पाच गावांमधील ४६३ हेक्टर पीकक्षेत्र बाधित झाले आहे. ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. नॉनस्टॉप कोसळणाऱ्या पावसामुळे शेतशिवार तसेच रस्त्यावर पाणी साचले. नदीकाठच्या महामार्गावरदेखील पाणी साचले. त्यामुळे वाहतूकदेखील विस्कळीत झाला. पावसामुळे अनेक गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मोहोळ तालुक्यात २११३ हेक्टर बागायत, तसेच २९ हेक्टर फळ पीक क्षेत्राचे नुकसान झाले असून, एकूण २१४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, तसेच माढा तालुक्यात ३८८ हेक्टर बागायत, तसेच ७५ फळपीक क्षेत्र बाधित झाले असून, एकूण ४६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, तसेच माढ्यात पावसामुळे एक जनावर दगावले आहे.