मोठी बातमी; सोलापुरातील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:32 AM2020-12-30T10:32:21+5:302020-12-30T10:33:17+5:30
महापालिका आयुक्त, उपायुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल झाला गुन्हा
सोलापूर : नियमबाह्य कामांसाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची फिर्याद सदर बझार पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिसांनी काळे याच्याविरुध्द खंडणी, सरकारी कामात अडथळा आणणे यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
'लोकमंगल' समुहाच्या वतीने रविवारी मेहता प्रशालेच्या प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात ई टॉयलेट, कचरा पेट्या व इतर साहित्याची व्यवस्था करावी, यासाठी राजेश काळे झोन अधिकाऱ्यांना फोन करुन शिवीगाळ करीत होते. प्रशासकीय मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही पाठविता येणार नाही. तुम्ही शासकीय नियमानुसार यापूर्वीच पत्रव्यवहार करणे अपेक्षित होते, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते.
यावरुन संतापलेल्या राजेश काळेंनी रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमाराला धनराज पांडे, झोन अधिकारी निलकंठ मठपती यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यानंतर काळे यांनी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनाही फोनवरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारी
बेकायदेशीर कामे करण्यासाठी राजेश काळे अनेक दिवसांपासून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. आरोग्य विभागातील कामे मी सांगेल त्याच कंत्राटाराला देण्यात यावी, मला टक्केवारी दिल्याशिवाय कुणाचीही कामे मंजूर करु नका. यापूर्वी मी अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन कामाला लावले आहे, मी तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन. मंत्रालयात जाऊन तुमची बदली करायला लावेन, असेही म्हटल्याचे काळे यांच्याविरुध्द दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सर्व गटनेते अधिकाऱ्यांच्या पाठिशी
राजेश काळे यांच्या कृत्याचे कुणीही समर्थन करु शकत नाही. आपण उपमहापौर आहोत याची जाणीव काळे यांनी ठेवायला हवी होती. कोरोनाच्या काळात धनराज पांडे यांनी स्वत:चा आणि कुटूंबाचा जीव धोक्यात घालून सोलापूरकरांसाठी काम केले. आयुक्त, उपायुक्त ही माणसे बाहेरच्या गावातून आपल्या शहरात काम करण्यासाठी येतात. याची जाणीवही ठेवायला हवी. माझे सर्व पक्षाच्या गटनेत्यांशी बोलणे झाले आहे. सर्व गटनेते अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहेत, असे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सांगितले.