मोठी बातमी; सोलापूर शहरातील १६ रुग्णालयांची मान्यता ४८ तासांत रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 04:16 PM2021-08-06T16:16:38+5:302021-08-06T16:16:45+5:30
महापालिका उपायुक्तांचा इशारा : दाेन महिने मुदत देऊनही काम करण्यास उशीर
साेलापूर : गेली दाेन महिने मुदत देऊनही अग्निशमन यंत्रणेची उभारणी न केल्याप्रकरणी शहरातील १६ माेठ्या रुग्णालयांना ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. ४८ तासांत काम न झाल्यास या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी गुरुवारी दिला.
राज्यात अलीकडच्या दिवसांत नाशिक, विरार, भांडूप येथील खासगी व शासकीय रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडल्या. रुग्णांचे बळी गेले. राज्य शासनाने सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेची उभारणी करण्याचे आदेश दिले. ही यंत्रणा नसेल तर रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. यानुसार महापालिकेने मे महिन्यात शहरातील रुग्णालयांची तपासणी केली. अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नसलेल्या रुग्णालयांना १२ मे व ४ जून राेजी नाेटिसा बजावण्यात आल्या. तरीही अद्याप १६ रुग्णालये बेफिकीर असल्याचा अहवाल अग्निशामक यंत्रणेने दिला आहे. या रुग्णालयांना आता ४८ तासांची मुदत आहे. अन्यथा, त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार कारवाई हाेईल, असेही पांडे यांनी सांगितले.
----
या त्रुटी राहिल्या
होजरील सिस्टीम, वेट रायझर सिस्टीम, यार्ड हेड्रट सिस्टीम, स्प्रिंकलर सिस्टीम मॅन्युअली ऑपरेटेड, इलेक्ट्रिक फायर अलार्म, एल.पी.एम. फायर पंप, आदी यंत्रणा नसल्याचा ठपका अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी ठेवला आहे.
या रुग्णालयांचा समावेश
सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बँक अँड नेक पेन क्लिनिक, डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल, नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, लोकमंगल जीवक हॉस्पिटल ॲड रिसर्च सेंटर, फोनिक्स क्लिनिक, निर्मल हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल, नान्नजकर हॉस्पिटल, सुहास नर्सिंग होम, बलवंत इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्सेस, जय हॉस्पिटल, सिद्धार्थ हॉस्पिटल, अल फैज चॅरिटेबल हॉस्पिटल, सोलापूर पाईल्स केअर सेंटर, कृष्णा हॉस्पिटल.
----