मोठी बातमी; वाराणसी येथील काशीपीठात होणार धार्मिक त्रिवेणी संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 02:55 PM2022-03-28T14:55:41+5:302022-03-28T14:55:48+5:30
पंच जगद्गुरु, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार राहणार उपस्थित
सोलापूर : वाराणसी येथील काशीपीठ येथे लिं. श्री श्री श्री 1008 जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांची 105 वा जन्ममहोत्सव, श्री श्री श्री 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा अमृत महोत्सव व प. पू. ष. ब्र. धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी (मठाधिपती, होटगी बृहन्मठ) यांची श्रीक्षेत्र काशीपीठ पट्टाभिषेक सोहळा अशा तीन धार्मिक कार्यक्रमांचा त्रिवेणी संगम होणार असल्याची माहिती अशी पिठाचे नूतन उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काशी येथील जंगमवाडी मठात 3 एप्रिल ते 13 मे दरम्यान सलग 42 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रतिदिन अतिरुद्राभिषेक, बिल्वार्चन, कुंकुमार्चन अन्नदान आणि तुलाभार असे कार्यक्रम होणार आहेत. या रुद्राभिषेकामध्ये वाराणसी, शादनगर, बिसनळी, गदग येथील येथील गुरुकुलांचे प्राध्यापक, वैदिक विद्यार्थी आणि विविध प्रांतातील वीरशैव लिंगायत जंगम पुरोहित मंडळ सहभागी होणार आहे. लक्षबिल्वार्चन आणि श्रीयंत्रास ललिता सहस्त्रनाम पठणपूर्वक लक्षकुंकुमार्चन कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी निवास व प्रसादाची सोय करण्यात आली आहे. प्रति दिवस संध्याकाळी धर्म सभेनंतर विद्यमान जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तुलाभार होणार आहे. सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्तीने सहभागी होण्यासाठी सर्व समाजातील लोकांना सेवा करण्याची संधी उपलब्ध आहे तरी सर्व इच्छुक भक्तांनी आपले नाव नोंदवून सेवेत सहभागी होऊन जगद्गुरुंच्या कृपाशीर्वादास पात्र व्हावे आवाहन काशीपीठाचे शिष्य सिद्धय्या स्वामी-हिरेमठ यांनी केले.
या अभूतपूर्व अशा धार्मिक सोहळ्यास पंचपीठाचे जगद्गुरु, विविध मठाचे मठाधिपती, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस सचिव शांतय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, दिलीप दुलंगे, महेश अंदेली, राजशेखर बुरकुले आदी उपस्थित होते.