मोठी बातमी : सोलापूरच्या शासकीय रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप
By Appasaheb.patil | Published: January 2, 2023 02:55 PM2023-01-02T14:55:04+5:302023-01-02T14:55:54+5:30
२४ तासात निर्णय न झाल्यास उद्यापासून अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा.
सोलापूर : वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या जागांची पदनिर्मिती करावी, महाराष्ट्रातील सर्व शासकीय पालिका महाविद्यालयात अपुरे व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी यासह आदी विविध मागण्यांसाठी सोलापुरातील शासकीय रूग्णालयात असलेल्या निवासी डॉक्टरांनी सोमवारी संप पुकारला.
दरम्यान, सकाळी शासकीय रूग्णालयातील बी ब्लॉकसमोर एकत्र येत डॉक्टरांनी विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपामध्ये सोलापुरातील २०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. या संपाबाबत राज्य सरकारने निर्णय नाही घेतला तर उद्यापासून अत्यावश्यक सेवा पण बंद करण्याच्या इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी डॉ. विकास कटरे, डॉ. दीपक काटे, डॉ. ओंकार शेंडे, डॉ. सागर राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टरांची उपस्थिती होती.
मागील कित्येक वर्षापासून शासन निवासी डॉक्टरांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आतापर्यंत आंदोलने, लेखी निवेदन, निर्दशने करूनही मागण्या सुटत नसतील तर काय उपयोग. आता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून आमच्या मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधत आहोत, २४ तासात सरकारने मागण्याबाबत निर्णय नाही घेतल्यास उद्यापासून अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा संपातील डॉक्टरांनी यावेळी दिला.