मोठी बातमी; महामार्गावरील अपघातग्रस्तांचे प्राण वाचवा; लाखाचा पुरस्कार मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 07:28 PM2022-05-31T19:28:19+5:302022-05-31T19:28:22+5:30
जिल्हास्तरावर मिळणार पाच हजार अन् सन्मानचिन्ह
सोलापूर : अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणाऱ्यांना जिल्हास्तरावर पाच हजार रुपये मिळणार आहेत. शिवाय राज्यभरातून आलेल्या प्रस्तावांपैकी दहा जणांना एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी नुकतेच दिले असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
शहरासह जिल्ह्यातील विविध गावांतून जाणाऱ्या रस्त्यांवर, तसेच महामार्गावरील होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. सर्वांत जास्त अपघात हे महामार्गावर होत असून, अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो. मात्र, आता अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्यांना राज्य आणि जिल्हा स्तरावर रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी, तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी मृत्युंजय दूताचा उपक्रम राबविण्यात येत आहे, तसेच महामार्ग पोलिसांकडून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचे कामही सुरू असून, अपघात रोखण्यासाठी मदत होत आहे.
----------
जिल्हास्तरावर पाच हजार, सन्मानचिन्ह
- - अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचविल्यास त्या नागरिकाला जिल्हास्तरावर पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
- - महामार्गावर मृत्युंजय दूतांकडूनही अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहोचविण्याचे कार्य अहोरात्र सुरू आहे.
-----------
राज्यस्तरावर दहा जणांना लाखाचा पुरस्कार
- - अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवून रुग्णालयात पाठवून मदत करणाऱ्याला राज्यस्तरावरही पुरस्कृत केले जाणार आहे.
- - राज्यातील दहा जणांची निवड करून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
---------
जिल्हास्तरीय समित्या नेमण्याचे निर्देश
अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला असून, तत्काळ मदत पोहोचवून जीव वाचविणाऱ्याला पुरस्कृत केले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, तसेच आरटीओ यांचा समावेश राहणार आहे.
--------
जिल्ह्यातील अपघाताची स्थिती...
सोलापूर जिल्ह्यात अपघातात मदत करणाऱ्या अनेकांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच त्यांना बक्षीस जाहीर होईल अन् त्याचे वितरणही होईल. अपघात होऊ नयेत यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जाते. शिवाय वाहतूक नियमांबाबत प्रचार, प्रसार केला जातो.
- मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण
---------
सोलापूर ग्रामीणने पाठविले प्रस्ताव
- - मागील पंधरवड्यात सारोळे पाटीजवळ अपघात झाला. या अपघातात जखमींना मदत करणाऱ्या हॉटेलचालक व अन्य व्यक्तीची माहिती संकलित करीत आहोत, त्याचाही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
- - मोहोळजवळ मोठा अपघात झाला. आत्तार कुुटुंबातील सदस्यांचा त्यात मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या माजी सरपंच माने यांना बक्षीस मिळावे यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करीत आहे.
- - याशिवाय अन्य ठिकाणच्या अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांचा प्रस्ताव यापूर्वीच जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने पाठविण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल.