मोठी बातमी; बाळंतपणे केली नाहीत म्हणून राज्यातील ५९७ परिचारिकांची सेवा समाप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 12:43 PM2021-08-30T12:43:54+5:302021-08-30T12:44:05+5:30
केंद्र शासनाकडून कपात: राज्यातील ५९७ पदे केली रद्द
सोलापूर : जिल्हा आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या ३९ आरोग्यसेविकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश आरोग्य अभियानाचे आयुक्त रामा स्वामी यांनी शुक्रवारी दिले आहेत. आरोग्य उपकेंद्रांतर्गत बाळंतपण न करणाऱ्या राज्यातील ५९७ परिचारिकांना आता घरी बसावे लागणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखड्यासाठी नर्सिंग कार्यक्रमासाठी बिगर आदिवासी क्षेत्राकरिता ३ हजार २०७ एएनएमची पदे मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. पण केंद्र शासनाने चालू वर्षातील ५९७ पदांना मंजुरी व वेतन दिलेले नाही. त्यामुळे ही पदे रद्द करणे आवश्यक असल्याचे आयुक्त रामा स्वामी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ३९ पदे ३१ ऑगस्टअखेर रद्द करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशान्वये मागील एक वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रांतील आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्यात यावीत. ही कारवाई करताना उपकेंद्राची सन २०११ च्या जनगणनेनुसार यादी तयार करून त्यात कमीतकमी लोकसंख्या असलेल्या उपकेंद्रांची पदे रद्द करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. २८ ऑगस्टपर्यंत रद्द केलेल्या पदांचा अहवाल सादर करावा. तसेच रद्द केलेल्या पदांचे वेतन अदा करण्यात येणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला कळविण्यात आले आहे.
बाळंतपणे कमी झाल्याचे कारण
या योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी २१२ पदे मंजूर करण्यात आली होती. यातील १७३ पदांना चालू वर्षी मंजुरी देण्यात आली आहे. ३९ पदांना मंजुरी देण्यात आली नाही. सन २०१० पासून या आरोग्यसेविका सेवेत होत्या. बाळंतपणे कमी झाल्याचे कारण दाखवून त्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.
राज्यात ५९७ परिचारिका जाणार घरी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील जिल्हा आरोग्य विभागाकडे अशी ३ हजार २०७ पदे मंजूर करण्यात आली होती. पण, आता चालू वर्षी फक्त २ हजार ६१० पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ५९७ परिचारिकांना घरी बसावे लागणार आहे.
जिल्हानिहाय कमी होणार पदे
पुणे : १६, सातारा: २९, कोल्हापूर:२३, सांगली: २१, सिंधुदुर्ग: १९, लातूर:२२, उस्मानाबाद: १६, बीड: ३०, औरंगाबाद:८, जालना: १०, अहमदनगर:२९, नागपूर:२४, यवतमाळ:२१, वर्धा: २२, नांदेड: ३७, नाशिक:१९.
रिक्त पदांनुसार संधी
काढून टाकण्यात येणाऱ्या परिचारिकांना जागा रिक्त झाल्यावर संधी देण्यात येणार आहे. अशांनी आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक यांच्याकडे अर्ज करावेत. यावर सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात येईल. रिक्त जागांप्रमाणे समुपदेशन करून नोकरी गेलेल्यांना संधी देण्याचा प्रस्ताव आहे.