मोठी बातमी; शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत गेले फडणवीसांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 06:25 PM2021-12-24T18:25:36+5:302021-12-24T18:25:42+5:30
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झाली
सोलापूर: शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी बुधवारी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईत विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत. बुधवारी विधानभवनासमोर आमदार तानाजी सावंत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणवीस यांची अर्धा तास प्रतीक्षा करीत होते. तुळजापूरच्या आमदारांच्या मध्यस्थीने त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या भेटीचा व्हीडीओ व्हायरल होताच जिल्ह्यात वेगवेगळी चर्चा सुरू झाली.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला रामराम करीत अनेकांनी राष्ट्रवादीशी सलगी केली आहे. सोलापूर शहरात महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष बळकटीवर भर दिला आहे. तर इकडे शिवसेनेत पडझड वाढत चालल्याने अनेकजण नाराज असल्याचे सांगितले जात आहे. आमदार सावंत हेही बऱ्याच दिवसापासून अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. अशात त्यांची फ़डणवीस भेट चर्चेची झाली आहे.
कारखान्यासंबंधी चर्चा
दरम्यान आमदार तानाजी सावंत व विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या भेटीबाबत शिवसेनेचे समन्वयक शिवाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. साखर कारखान्याच्या सात संचालकांच्या प्रश्नासाठी आमदार सावंत यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ नाही असे त्यांनी म्हटले आहे.