मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यात शाळेची घंटा न वाजताच भरत आहे प्राथमिकचे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 11:52 AM2021-11-26T11:52:40+5:302021-11-26T11:52:43+5:30
राज्यातील पहिला प्रयोग : पालकांकडून स्वागत
सोलापूर : कोरोनामुळे राज्यभरातील प्राथमिक शाळा बंद आहेत; पण मुलं घरी बसून कंटाळली होती. यामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना विचारणा होत होती. यामुळे सोलापूरचे प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील प्राथमिक वर्ग भरविण्याचा निर्णय घेतला. आता शाळेची घंटा न वाजताच शाळा भरू लागल्या आहेत. शाळेत जवळपास ६० ते ७० टक्के विद्यार्थी दररोज वर्गात येत आहेत.
पालकांनी विद्यार्थ्यांकडून वारंवार शाळा सुरू करण्याबाबत विचारणा होत असल्यामुळे शिक्षणाधिकारी लोहार यांनी वर्ग भरण्याबाबत अधिकाऱ्यांची व शिक्षकांची चर्चा केली. याला शिक्षकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे जिल्ह्यातील पहिली ते पाचवी जवळपास दोन हजार शाळा सुरू झाले आहेत. राज्यभरातील सोलापूर जिल्ह्यातच प्राथमिकचे वर्ग भरत असल्यामुळे पालकांकडून याचे कौतुक होत आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
वर्ग भरविताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दक्षताही घेतली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. सोबतच ज्या वर्गात पटसंख्या जास्त आहे अशा वर्गात दोन तुकड्यांमध्ये वर्ग भरविले जात आहेत. पण, वर्ग भरवत असताना वेळेची मर्यादा ठेवण्यात आली नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली
शाळा सुरू करण्यासाठी पालकच आग्रही होते. याचा विचार करून सध्या वर्ग सुरू भरवण्यात येत आहेत. यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेकडे आमचे विशेष लक्ष राहणार आहे. सोबतच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
- किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)