मोठी बातमी; सोलापुरात ८ मेपासून १५ मेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद
By Appasaheb.patil | Published: May 6, 2021 09:16 PM2021-05-06T21:16:22+5:302021-05-06T21:25:17+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. तथापि रुग्णांची संख्या वाढतच आहे.
गुरुवारी (दि.6) सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नवीन निर्बंध जाहीर केले. या पत्रकार परिषदेस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या आठ तारखेला रात्री आठ वाजल्यापासून पंधरा तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व सेवा बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही वेळापूर्वी महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद सीईओ यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली आहे.
जिल्ह्यात कडक संचारबंदी राहील. मेडिकल वगळता किराणा दुकाने, भाजीपाला, दूध विक्रीही पूर्णता बंद राहील. पासधारक दूध विक्रेत्यांना दूध घरपोच देता येईल. मार्केट यार्डही बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरूवारी रात्री दिले आहेत.
सदर आदेश सोलापूर शहर व ग्रामीण परिसरात लागू राहील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्याने निर्बंध लागू केल्याची माहिती दिली.