मोठी बातमी; सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड यांच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 03:13 PM2021-08-02T15:13:09+5:302021-08-02T15:18:11+5:30
बापरे... बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई
सोलापूर: जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय राठोड यांची उस्मानाबादला बदली झाली तरी त्यांनी प्रलंबित कामे पूर्ण केल्याशिवाय कार्यमुक्त केले जाणार नाही असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून राठोड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत चार वर्षे काम केले आहे. कोरोना महामारीमुळे त्यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली. नुकतीच त्यांची उस्मानाबादला बदली झाली आहे, पण त्यांनी गेल्या वर्षभरात शिक्षकांची अनेक कामे प्रलंबित ठेवली आहेत. मुख्याध्यापक पदोन्नती, बोगस प्रमाणपत्र देऊन पदोन्नती घेतलेले शिक्षकांच्या बेकायदेशीरपणे केलेल्या नियुक्त्या याबाबत राठोड यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. या सर्व तक्रारींचा निपटारा लावल्याशिवाय त्यांना कार्यमुक्त केले जाणार नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे तर नव्याने येणाऱ्या शिक्षणाधिकारी लोहार यांचा पदभार लांबणीवर पडला आहे.
प्राथमिक शिक्षण विभागात सुमारे 60 शिक्षकांनी यापूर्वी बोगस कर्णबधिर व इतर दिव्यांगाचे दाखले देऊन मुख्याध्यापक पदावर पदोन्नती घेतली आहे. अशा शिक्षकांची यापूर्वी चौकशी झाली आहे. आरोग्य विभागाने अहवाल दिला आहे. या शिक्षकांची ससून रुग्णालयात तपासणी करावी, अशी शिफारस झाली आहे. तरीपण शिक्षण विभागाने हा प्रस्ताव मागे ठेवला आहे. त्यामुळे आता बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या शिक्षकांची चौकशी पुन्हा नव्याने होणार आहे.