मोठी बातमी; एसटीला टिप्परची धडक; बस चालकासह १७ प्रवासी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 10:58 AM2022-06-13T10:58:38+5:302022-06-13T10:58:45+5:30
कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळील घटना
कुर्डूवाडी : कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळ मिरजकडून पंढरपूर मार्गे माजलगावकडे जाणाऱ्या एसटी बसला टिप्परने समोरून जोराची धडक दिल्याने एसटी बस चालकासह एकूण १७ प्रवासी जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.
याबाबत एसटी बस चालक प्रकाश तुकाराम मुंडे (वय ३४, मिरज डेपो, ता.कंधर, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवर टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात ७६ प्रवासी असलेल्या या बसचे मोठे नुकसान झालेले असून बसचालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी बालंबाल बचावले. फिर्यादी मिरज-माजलगाव एसटी बस क्र.- एम .एच.०६, एस-८३७१ ही बस घेऊन जात असताना एम.एच-४५ टी-१०५५ क्रमांकाच्या टिप्परने अपघात स्थळापासून जवळच असलेल्या एका डांबर प्लांटपासून भरधाव वेगाने येत समोरील बाजूस जोराची धडक दिली.
यात बसचे समोरील बाजूने मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर टिप्पर चालकाने तेथून लागलीच पळ काढला. यात जखमी झालेल्या बस चालकासह एकूण १७ प्रवाशांना ताबडतोब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. तिथे किरकोळ व गंभीर जखमी झालेल्यावर उपचार करून दुसऱ्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करत त्यांना पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत केली.व अपघातातला टिप्पर जप्त करून पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आला.
......................
दीड वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचला
चौकट-एसटी बसच्या चालकाला टिप्पर आपल्याला समोरून धडक देत असल्याचा अंदाज येताच त्यांच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या एका दीड वर्षाच्या चिमुकल्याकडे त्यांनी पाहत एसटी बस खाली घेण्याचा प्रयत्न केला व अपघातातून त्या बाळाचे प्राण वाचविले. यामुळे सर्व प्रवाशांबरोबरच ड्रायव्हर सीटमागे बसलेल्या त्या चिमुकल्याचा जीव वाचल्याने बस चालकाचे सर्वांनी कौतुक केले. त्यात त्यांना स्वतःला जखमी व्हावे लागले.