मोठी बातमी; सुरत - चेन्नई महामार्गाला आठ दिवसात मंजुरी मिळणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 07:57 PM2022-02-27T19:57:56+5:302022-02-27T19:58:00+5:30
प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे : मार्ग सोलापुरातून गेल्याने मान्यतेची गरज
सोलापूर : जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस महामार्गाला पुढील आठ दिवसात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. या आठवड्यात सुरत - चेन्नई महामार्गाबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या मुंबईतील वरिष्ठ कार्यालयात बैठक झाली असून, या बैठकीनंतर महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविल्याची माहिती आहे.
सोलापूरच्या हद्दीबाहेरील सुरत - चेन्नई एक्स्प्रेस महामार्गाला केंद्र सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. यापूर्वीचा नियोजित महामार्ग सोलापूरच्या हद्दीतून जाणारा नव्हता. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वीचा नियोजित महामार्ग बदलून सुरत - चेन्नई महामार्ग सोलापूरच्या हद्दीतून नेण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे सोलापूरच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गाला केंद्राची मंजुरी मिळविणे गरजेचे आहे. हा महामार्ग अहमदनगर येथून उस्मानाबाद जिल्ह्यातून बार्शीत प्रवेश करतो. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांमधून अक्कलकोट तालुक्यात प्रवेश करतो. त्यानंतर हा महामार्ग अक्कलकोट येथून थेट कर्नुलला जोडतो.
बार्शी आणि अक्कलकोटच्या हद्दीतून जाणाऱ्या सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस महामार्गाच्या मान्यतेसाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणची कमिटी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. राजमार्ग प्राधिकरणची भूसंपादन कमिटी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे कागदपत्रांची पूर्तता करत आहे. सोलापूरच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गाचा मार्ग निश्चित झाला असून, या मार्गावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्राची मंजुरी गरजेची आहे.
भूसंपादनासाठी पाठपुरावा
साधारणपणे जिल्ह्यातील ५६ गावांमधून हा महामार्ग जाईल. सोलापूरच्या हद्दीत ७५ किलोमीटरचा मार्ग असून, या मार्गामुळे सोलापूरचा कायापालट होणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीत ठाण मांडून असून, भूसंपादनासाठी पाठपुरावा करत आहेत.