मोठी बातमी; काळ्या बाजारात विक्रीला जाणारा तांदूळ, गहू टेंभुर्णी पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 03:04 PM2021-09-10T15:04:19+5:302021-09-10T15:05:43+5:30
टेंभुर्णी - टेंभुर्णी (ता. माढा ) पोलिसांनी धाडसी कारवाई करून मोडनिंब येथील गोरख पांडुरंग सुर्वे या अडत दुकानातून ट्रकमध्ये ...
टेंभुर्णी - टेंभुर्णी (ता. माढा) पोलिसांनी धाडसी कारवाई करून मोडनिंब येथील गोरख पांडुरंग सुर्वे या अडत दुकानातून ट्रकमध्ये भरण्यात आलेला व गोडाउनमध्ये साठवून ठेवलेला ७ लाख ६५ हजार किंमतीचा संशयित रेशनचा गहू व १ लाख ७९ हजार किंमतीचा गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला रेशनचा तांदूळ असा ९ लाख ४४ हजार किंमतीचा माल पकडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना दि.८ रोजी मोडनिंब येथील मार्केट यार्ड मधील गोरख पांडुरंग सुर्वे या आठ दुकानातून रेशनचा गहू व तांदूळ ट्रकमध्ये भरला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावर कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही. काशीद यांचे पोलीस पथक पाठविण्यात आले. सदर पथक दि. ८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता घटनास्थळी पोचले, तेव्हा एम एच ४५/एएफ ००५४ या क्रमांकाच्या मालट्रकमध्ये गव्हाची पोती भरत असल्याचे निदर्शनास आले तसेच अडत दुकानाच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले ३ लाख ४० किमतीच्या ३५० गोण्या गहू व १ लाख ७९ हजार किमतीचा १५० गोण्या तांदूळ आढळून आला.
दरम्यान, गोडाऊनमध्ये गव्हर्मेंट ऑफ पंजाब असा शिक्का असलेली रिकामी पोतीही आढळून आली. ट्रकमधील गव्हाचे वजन केले असता ते २५०८० किलो भरले त्याची किंमत अंदाजे ४ लाख २५ हजार एवढी आहे. असा एकूण ९ लाख ४४ हजार किंमतीचा माल बेकायदेशीर विक्री करण्यासाठी ट्रकमध्ये भरत असताना व गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला पोलिसांना मिळून आला.