मोठी बातमी! जी २० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार पंढरपूरची आषाढी वारी
By Appasaheb.patil | Published: June 1, 2023 07:18 PM2023-06-01T19:18:46+5:302023-06-01T19:19:02+5:30
आषाढीच्या काळात जी २० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे.
सोलापूर : वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. हीच सांस्कृतिक परंपरा यंदा जी २० चे प्रतिनिधी पाहणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आषाढीच्या काळात जी २० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपुरची वारी आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील या वैशिष्ट्यपूर्ण अशा वारीचे दर्शन घडवा, त्यासाठी उत्तम नियोजन करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधीसह पुणे, सोलापूरचे अधिकारीही उपस्थित होते.
वारीच्या नियोजनासाठी पालखी मार्ग आणि पंढरपूरसह, वारी मार्गावरील विविध ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रत्यक्ष भेटी देऊन नियोजनाची पाहणी करणार आहेत. यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पालखी मार्ग तसेच वारीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावर्षी वारीकरिता 60 टक्क्यांनी अधिकचे मनुष्यबळ तसेच पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याची माहिती राव यांनी दिली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाच्या सचिव सोनिया सेठी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनुटिया आदी उपस्थित होते.