मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबरला मंगळेवढ्यात

By Appasaheb.patil | Published: September 14, 2022 04:18 PM2022-09-14T16:18:11+5:302022-09-14T16:18:17+5:30

मंगळवेढ्याच्या कदम गुरुजी महाविद्यालयात होणार युवा महोत्सव !

big news; This year's Youth Festival of Solapur University will be held from 7th to 10th October | मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबरला मंगळेवढ्यात

मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबरला मंगळेवढ्यात

Next

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव दि. ७ ते १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून युवा महोत्सवाच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाकडून युवा महोत्सव घेण्यासाठी प्रस्ताव आले होते. त्यानुसार समितीने संबंधित महाविद्यालयास भेट देऊन यंदाच्या महोत्सवाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

कोरोनामुळे गतवर्षीचा युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने पार पडला. त्यापूर्वीचा महोत्सव कोरोनामुळे रद्द झालेला होता. आता दोन वर्षाच्या कालावधीनंतर ऑफलाइन पद्धतीने युवा महोत्सव होणार आहे. त्यामुळे भारतीय विश्वविद्यालय संघाकडून प्राप्त सूचनेनुसार काही बदल यंदाच्या वर्षीसाठी करण्यात आले आहेत. या वर्षासाठी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी युवा विद्यार्थी कलाकारांची वयोमर्यादा २५ वर्षावरून २७ इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन संघ व्यवस्थापक, तीन व्यावसायिक साथीदार आणि विद्यार्थी मिळून एकूण ४९ जणांच्या संघाची प्रवेशिका यंदा स्वीकारली जाणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षापासून युवा महोत्सवात कथाकथन आणि काव्यवाचन या कलाप्रकारांचा समावेश करण्यात आल्याचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सांगितले. त्यानुसार आता युवा महोत्सवात एकूण २९ कलाप्रकारांचे सादरीकरण पहावयास मिळणार आहे.

विद्यार्थी कलाकारांनो तयारीला लागा; कुलगुरू डॉ. फडणवीस यांचे आवाहन
युवा विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सृजनरंगाला एक हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थी कलाकारांचा देखील मोठा प्रतिसाद दरवर्षी युवा महोत्सवाला लाभतो. त्यामुळे हा युवा महोत्सव अधिकाधिक दर्जेदार होत आहे. संलग्नित महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलाकारांनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची व संघाची प्रवेशिका देणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: big news; This year's Youth Festival of Solapur University will be held from 7th to 10th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.