मोठी बातमी; पश्चिम महाराष्ट्रात १.१८ कोटींच्या अनधिकृत वीज वापराचा पर्दाफाश

By appasaheb.patil | Published: August 25, 2021 05:21 PM2021-08-25T17:21:55+5:302021-08-25T17:22:26+5:30

महावितरणचा वीजचोरांना दणका- एकाच दिवशी १०४७ ठिकाणी वीजचोऱ्या उघड

Big news; Unauthorized power consumption of Rs 1.18 crore exposed in Western Maharashtra | मोठी बातमी; पश्चिम महाराष्ट्रात १.१८ कोटींच्या अनधिकृत वीज वापराचा पर्दाफाश

मोठी बातमी; पश्चिम महाराष्ट्रात १.१८ कोटींच्या अनधिकृत वीज वापराचा पर्दाफाश

Next

सोलापूर - पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १०४७ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या ७५६ वीज चोऱ्यांचा समावेश आहे. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, या महिन्यात आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागात १ कोटी १८ लाख रुपयांच्या १३१० ठिकाणी वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध महावितरणची नियमित कारवाई सुरू आहे. ही कारवाई आणखी वेगाने व धडकपणे करण्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दि. २१ ऑगस्टला वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सकाळी ९ वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी ५ हजार ९५६ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्हा- ५७४, सातारा- १३०, सोलापूर- १०७, कोल्हापूर- ११६ व सांगली जिल्ह्यात १२०, असा एकूण १०४७ ठिकाणी अनधिकृतपणे वीजवापर सुरू असल्याचे आढळून आले.

या एकदिवसीय विशेष मोहिमेत प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांच्यासह प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते व जनमित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोबतच महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील वीजचोऱ्या उघड करण्यास विशेष सहकार्य केले. उघडकीस आलेल्या वीजचोऱ्या विशेषतः सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषी ग्राहकांकडील आहेत. वीज बिलांच्या थकबाकीमुळे खंडित असलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

पुणे प्रादेशिक विभागात या महिन्यात आतापर्यंत १३१० ठिकाणी १ कोटी १८ लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे. यातील ९९ प्रकरणांमध्ये २१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये (कंसात रक्कम) पुणे जिल्हा- ५८० (६४.५९ लाख), सातारा- २७५ (१६ लाख), सोलापूर- २०५ (२२.२४ लाख), कोल्हापूर- १३० (१३.४० लाख) आणि सांगली जिल्ह्यामध्ये १२० ठिकाणी १.९२ लाखांचा अनधिकृत वीज वापर उघड झाला आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीज वापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. सोबतच वीज चोरीविरुद्ध नियमितपणे सुरू असलेली मोहीम आणखी वेगवान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Big news; Unauthorized power consumption of Rs 1.18 crore exposed in Western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.